Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक; निकालाकडे लक्ष

पालघर, भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक; निकालाकडे लक्ष

Published On: May 31 2018 7:30AM | Last Updated: May 31 2018 7:30AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज (गुरुवार दि.३१) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.

पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन्ही जागा भाजपकडे होत्या. या जागा राखण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय होते. तर, पालघरमध्ये शिवसेना आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा-गोंदियामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सरळ लढत झाली. ही पोटनिवडणूक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम ठरली असल्याने या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पालघरमध्ये 53.22 टक्के तर भंडारा-गोंदियात 53.15 टक्के मतदान झाले आहे. दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशिन बंद पडण्याचे प्रकार घडले होते. भंडारा-गोंदियात तर 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याची नामुष्की निवडणूक आयोगावर ओढवली होती. मागील निवडणुकीत पालघरमध्ये 62 टक्के, तर भंडारा-गोंदियामध्ये 72 टक्के मतदान झाले होते. मतांची ही घटलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते हेदेखील स्पष्ट होणार आहे.

रात्रीत 82 हजार मते कशी वाढली

निवडणूक झाल्यानंतर मतांची प्राथमिक आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. त्यामध्ये पालघर मतदारसंघात 46.50 टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अंतिम आकडेवारीनंतर 53.22 टक्के मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले. मतांच्या या वाढलेल्या टक्केवारीबाबत शिवसेनेने संशय व्यक्‍त केला आहे. एका रात्रीत 82 हजार मते कुठून आली, असा सवाल शिवसेनेने केला आहे. 

भंडारा-गोंदियात  5 वाजेपर्यंत 45 टक्के फेरमतदान
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज, बुधवारी 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान झाले. मतदारांनी दुपारपर्यंत मतदानाला फारसा प्रतिसाद दिला नव्हता. अनेक मतदान केंद्रांवर एकटदुकट मतदार आपला हक्‍क बजावताना दिसत होता. दुपारी 5 वाजेपर्यंत 45 टक्के मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार मधुकर कुकडे, भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्यासह 18 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनमध्ये बंद झाले.
 

Tags : palghar, bhandra-gondiya, loksabha, by election, result