Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ड्रग्जच्या अतिसेवनाने अथर्वचा मृत्यू?

ड्रग्जच्या अतिसेवनाने अथर्वचा मृत्यू?

Published On: May 18 2018 1:43AM | Last Updated: May 18 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

कांदिवली येथे राहणार्‍या नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व शिंदे याच्या मृत्यूबाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण असतानाच त्याच्या मृत्यूमागे ड्रग्जचे अतिसेवन असल्याचे चित्र समोर आले आहे. मात्र याबाबत  कोणीही अधिकारी बोलण्यास तयार नाही. 

फॉरेन्सिक अहवालानंतर या मृत्यूबाबत अधिकृतपणे खुलासा होईल असे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. अथर्वला कोणीही मारहाण केलेली नाही, मात्र ड्रग्जच्या सेवनामुळेच तो चालताना पडला आणि त्याला दुखापत झाली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 अथर्वच्या मृत्यूचा तपास आता दहिसर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या मृत्यूचा तपास पूर्ण करून लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले नरेंद्र शिंदे यांचा अथर्व हा मुलगा आहे. सोमवारी 7 मेला सायंकाळी साडेसात वाजता तो घरातून मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गोरेगाव येथे गेला होता. आरे कॉलनीतील एका बंगल्यात ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथेच अथर्व याच्यासह वीसहून अधिक तरुण-तरुणी तसेच काहींचे पालकही सामील झाले होते. या सर्वांनी पार्टीत मद्यप्राशन करून ड्रग्जचे सेवन केले होते. अथर्व यानेही एका महागड्या ड्रग्जचे सेवन केले होते. त्यानंतर तो रात्री गेटवरून चढून बाहेर निघून गेला होता. त्याने रस्त्यावरून जाणार्‍या रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मद्यपी तरुण असावा असे समजून कोणीही त्याच्या मदतीला धावून आला नाही. चालताना त्याच्या शरीराला अनेक ठिकाणी दुखापत झाली होती. दोन दिवसांनी अथर्वचा मृतदेह आरे कॉलनीतील जंगलात आरे पोलिसांना सापडला होता.

एक-दोन मित्र वगळता इतर सर्वांना ड्रग्जचे सेवन केले होते. त्यामुळे ते सर्व जण ड्रग्जच्या नशेत बंगल्यात उशिरा झोपून होते. त्यांना अथर्व कधी बाहेर गेला, त्याच्याबाबत काय घडले याची कोणालाही काहीही माहिती नव्हती. मात्र दोन दिवसांनी त्याचा मृतदेह सापडल्याने अनेकांना मानसिक धक्का बसला होता.