Wed, Jul 17, 2019 16:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राच्या एमू शेतीला ‘आऊटशूर्न’ पॅटर्नची गरज

महाराष्ट्राच्या एमू शेतीला ‘आऊटशूर्न’ पॅटर्नची गरज

Published On: Jun 06 2018 9:38PM | Last Updated: Jun 06 2018 9:38PMमुंबई : प्रतिनिधी

एमूच्या शेतीने जो दगा दिला त्यातून महाराष्ट्राचे शेतकरी अजूनही सावरलेलेे नाहीत. अनेक शेतकर्‍यांच्या कपाटात आजही शिरकाण केलेल्या एमू पक्षांच्या  मांसापासून काढलेले तेल तेवढे शिल्‍लक आहे. त्यालाही गिर्‍हाईक मिळालेले नाही. त्याच एमूची शेती मात्र आता पाकिस्तानही चांगलीच बहरू लागली आहे. याचे कारण पॅटर्न. दक्षिण आफ्रिकेतील एमू आणि शहामृगाच्या शेतीचा ‘आऊटशूर्न’ पॅटर्न आज जगाचा केंद्रबिंद्र बनला आहे. नव्हे क्‍लेन कारू प्रांतात देखण्या पर्वतराजींच्या कुशीत विसावलेले आऊटशूर्न शहर हे जगाची ‘शहामृग राजधानी’ म्हणून ओळखले जात आहे. 

एमू काय किंवा शहामृग या दोन्ही महाकाय पक्षांना कोरडे किंवा अगदी दुष्काळी वातावरण लागते. या वातावरणाचा फायदा उठवत आऊटशूर्न शहराने शहामृगांच्या पिसांचा उद्योग सुरू केला आणि या शहामृग पिसांच्या स्पर्शाने इथले आयुष्यच पालटून गेले. आज आऊटशूर्नच्या सफारी ऑस्ट्रिच फार्मवर जगभरातून पर्यटक येतात. ट्रॅक्टरमध्ये बसून शहामृगांमधून फिरतात, महाकाय शहामृग पक्षांवर बसून सफारीही करतात आणि याच ठिकाणी शहामृगाच्या पिसांपासून, कातड्यांपासून आणि हाडांपासूनही तयार केलेल्या अत्यंत देखण्या वर तितक्याच महागड्या वस्तू खरेदी करतात. शहामृगाच्या कातड्यापासून तयार केलेली पर्स, किंवा पाकीट किंवा बॅग ही आयुष्यभर टिकते आणि जितकी ती जुनी होत जाते तितकी ती अधिक देखणी दिसते. शहामृगाचे मांस किंवा अंडी हा तसा मुख्य व्यवसाय असला तरी या सर्वात मोठ्या पक्षाच्या पिसांनी मात्र जग वेडावले. या वेडातूनच एकट्या दक्षिण आफ्रिकेत हा उद्योेग 4 अब्ज डॉलर्सची उलाढाल वर्षाकाठी करू लागला आहे. त्यातून किमान दोन लाख भूमिपुत्रांना रोजगार मिळाला. शहामृग शेतीचे पर्यटन सुरू झाले, खेळ सुरू झाले, शहामृग शेतात मैफिली सजू लागल्या आणि या पूरक उद्योगांनी हा उद्योग चहूबाजूंनी बहरला. 

महाराष्ट्राने हा पॅटर्न स्वीकारला असता तर आपल्याकडेही आऊटशूर्नसारखे शहामृग तथा एमू पर्यटन सुरू झाले असते. राज्याच्या पशूसंवर्धन खात्याच्या माहितीनुसार 2010 च्या सुमारास महाराष्ट्रात किमान दीडशे एमू फार्म्स सुरू झाल्या. प्रत्येक फार्मवर एमू पक्षांच्या 20 ते 30 जोड्या होत्या. ऑक्टोबर ते मार्चदरम्यान 20 ते 40 अंडी घालतील अशी अपेक्षा होती. अंड्याशिवाय एमूचे मांस आणि या मांसापासून काढलेले तेल यांस आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असते, असेही शेतकर्‍यांना सांगितले गेले होते. पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकर्‍यांनी एमू फार्म्स सुरू केले. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेने जाताना हे एमू अशा फार्म्सवर मुक्‍त संचार करताना दिसत. हायवेंवरील अनेक हॉटेल्सच्या व ढाब्यांच्या मेनू कार्डवरही एमूच्या अंड्यापासूनचे ऑम्लेट आणि मांसही दिसू लागले. 2013 पर्यंत महाराष्ट्रातील एमूंची संख्या 10 हजारांवर पोहोचली होती. सहा वर्षांत मात्र एकाएकी हे पक्षी महाराष्ट्राच्या नकाशावरूनच गायब झाले. आजही या पक्षांसाठी उभारलेले पॉल्ट्री फार्म्सचे सांगाडे ठिकठिकाणी दिसतात आणि त्याकडे शेतकरी फक्‍त हताशपणे बघतात. राजगुरूनगरच्या परमेश्‍वर थिटेंनी 70 एमू घेतले होते. 3 ते 4 लाख रुपये गुंतवूनही पाच पैशांचा फायदा झाला नाही. खेड तालुक्यातील गोसासीचे प्रवीण गोरडे यांनीही 60 एमू आणले. त्यांच्या देखभालीचेच कर्ज वाढले. हा धंदा बंद करायचा ठरवले. सर्व एमूंची कत्तल करून त्यापासून तेल काढले. पुढची अनेक वर्षे या तेलाच्या बाटल्या गोरडेंच्या कपाटात पडून राहिल्या. कारण एजंटने सांगितले तसे घडले नाही. या तेलालाही गिर्‍हाईक मिळाले नाही. 

आता पाकिस्तानात सरकारचा कोणताही पाठिंबा नसताना एमू आणि शहामृगाची शेती बहराला आली आहे. कराची, पंजाब परिसरात यात मोठी गुंतवणूक दिसते. शहामृग पुरवणारी पाकिस्तान ऑस्ट्रिच कंपनीची तिथे निघाली. शहामृगाचे कातडे, अंडी, तेल, पिसे या प्रत्येकाची बाजारपेठ उभी राहते आहे. शहामृगाने एमूच्या तेलाचा वापर कॉस्मेटिक उद्योगात होतो. या पार्श्‍वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा आऊटशूर्न पॅटर्न पाहिला की महाराष्ट्राने काय गमावले याचा अंदाज येतो. एमू किंवा शहामृगाची शेती करताना त्यांच्या जोडधंद्याचा विचार केला असता तर हजारो शेतकर्‍यांवर दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली नसती. आज जगाच्या कानाकोपर्‍यातून लोक विमानाने दक्षिण आफ्रिका गाठतात. त्यांना आकर्षण असते शहामृगांच्या सफारीचे. त्याच्यापासून निर्माण केलेल्या एक ना अनेक वस्तूंचे. शहामृगाच्या पिसांनी दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन देखणे करून टाकले. दक्षिण आफ्रिकेचा इतिहास, जंगले, ऐतिहासिक स्थळे यांचे मार्केटिंग शहामृगाच्या पाठीवर बसून ज्या तर्‍हेने  केले जात आहे तो पॅटर्न म्हणून महाराष्ट्राने स्वीकारला पाहिजे. 

शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी

पूर्ण वाढ झालेला शहामृग 180 किलोपर्यंतचे वजन सहज वाहून नेऊ शकतो. या पक्षाची सरासरी उंची 2.2 ते 2.5 मीटर  असते आणि वजन 140 किलो. अर्थात ही पूर्ण वाढ होते ती फक्‍त दोन वर्षांत. एक शहामृग किमान 50 ते 75 वर्षे जगतो. जगातील सर्वात मोठे अंडे घालणार्‍या शहामृगाची ख्याती सर्वात गतीने धावणारा पक्षी म्हणूनदेखील आहे. जमिनीवरून तो ताशी 70 किलोमीटर वेगाने धावतो. गतीचे हे सातत्य चित्त्याला राखता येत नाही. त्यामुळे चित्तादेखील शहामृगाची शिकार करू शकत नाही. शहामृगाची नजर प्रचंड तीक्ष्ण असते आणि तीन किलोमीटरवरील बारीक हालचालही त्याला टिपता येते. 
 

एमू हा जगातील क्रमांक दोनचा मोठा 
पक्षी मूळचा ऑस्ट्रिेलियाचा. पूर्ण वाढ झालेल्या एमूचे वजन 60 किलो असते. त्याची उंची 1.6 मीटरपर्यंत वाढते.