Tue, Nov 19, 2019 12:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री

आम्ही फोडाफोडीचे राजकारण करत नाही: मुख्यमंत्री

Published On: Jun 16 2019 4:23PM | Last Updated: Jun 16 2019 4:18PM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

उद्यापासून पावसाळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. विशेषत:दुष्काळसंदर्भात चर्चा घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी फडणवीस यांनी विरोधी पक्षांचा चांगलाच समाचार घेतला. 

जवळपास १३ नविन विधयेक अधिवेशनात मांडली जातील. १५ विधेयक ही जुनी प्रलंबित असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यामधील १२ विधानसभेत आणि तीन विधानपरिषदेत अशी एकूण २८ विधयेक या अधिवेशानात चर्चेला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच दुष्काळाबाबत सरकारने ज्या उपाययोजना केल्या आहेत त्याची माहिती देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

तसेच भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडाफोडी केली जात आहे, या विरोधकांच्या आक्षेपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणालाही फोडले नाही. तुमच्या पक्षातील लोक तुमच्यासोबत राहायला का तयार नाहीत, याचे उत्तर द्या. त्यांचा नेतृत्वावर विश्वास उरलेला नाही. अन्यथा कोणताही नेता अशाप्रकारे फुटत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विरोधी पक्ष आमच्यावर आभासी सरकार चालवत असल्याची टीका करतात. मात्र तेच अजून आभासातून बाहेर आलेले नाहीत. विरोधकांची जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थितीशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळे त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

तत्पूर्वी विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कारभारावर टीका केली होती. मात्र, या पत्रकार परिषदेत एकही नवीन मुद्दा नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देण्यास सत्तारूढ पक्ष समर्थ असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. 

विरोधक आमच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करतात. मात्र, गेली १५ वर्षे मराठा आरक्षणाचा घोळ कोणी घातला? याउलट भाजप सरकारने वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर केल्या. धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनांसंदर्भात लवकर अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल. याबद्दल मी आता बोलणार नाही. एकूणच मागील सरकारने गेल्या १५ वर्षांत समाजातील ज्या ज्या घटकाला फसवले त्यांना आम्ही न्याय देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.