Sun, Aug 25, 2019 04:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मारेकर्‍यांचा पेट्रोल पंप लुटीचा होता कट

मारेकर्‍यांचा पेट्रोल पंप लुटीचा होता कट

Published On: Mar 21 2018 1:40AM | Last Updated: Mar 21 2018 1:25AMठाणे : प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या झाडून हत्या करणार्‍या चार मारेकर्‍यांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने ठाण्यातून सोमवारी सायंकाळी अटक केली होती. हे सर्व आरोपी पंढरपूर येथून ठाण्यात पळून आले होते. दरम्यान, पैसे नसल्याने ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोलपंप लुटून ते पैसे घेवून गुजरातमध्ये पळून जाण्याचा त्यांचा कट होता. मात्र, या घटनेची खबर ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना लागली अन् या मारेकर्‍यांचा कट उधळला गेला. 

ठाण्यातील माजीवडा परिसरात असलेला पेट्रोलपंप लुटण्यासाठी काही जणांची टोळी प्राणघातक हत्यारानिशी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना सोमवारी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. कोथमिरे व पोलीस निरीक्षक व्ही. एस. घोडके यांनी दोन पथके तयार करून ज्युपिटर हॉस्पिटलजवळील हरदासनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर सापळा लावला.

यावेळी सायंकाळी 6.30च्या सुमारास सहाजण पायी चालत येवून हरदासनगरकडे जाणार्‍या नाल्याजवळ आपापसात बोलत असल्याचे आढळून आले. खबरीने या सर्वांना ओळखताच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी या इसमांनी पोलिसांशी हातापायी करण्यास सुरुवात केली. यावर दोन्ही पोलीस पथकाने बळाचा वापर करत सहापैकी 4 जणांना ताब्यात घेतले तर दोनजण अंधाराचा फायदा घेत फरार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार यांची हत्या करून ठाण्यात पळून आल्याची कबुली दिली. पवार यांची हत्या केल्यानंतर या टोळीला परराज्यात पळून जायचे होते. मात्र जवळ पैसा नसल्याने ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोलपंप लुटण्याचा कट या टोळीने आखला होता. 

पेट्रोल पंप लुटीतून जे पैसे मिळतील ते घेऊन घोडबंदरमार्गे गुजरातमध्ये पळून जाण्याचा या मारेकर्‍यांचा प्लॅन होता. दरम्यान पोलिसांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार अक्षय उर्फ बबलू धनंजय सुरवसे (रा.सांगली), पुंडलिक शंकर वनारे, मनोज शंकर शिर्सेकर आणि भक्तराज ज्ञानेश्वर धुमाळ (तिघेही रा. पंढरपूर) या चौघांना अटक केली आहे. तर संदीप आधटराव व विकास उर्फ विकी मोरे हे दोन्ही आरोपी फरार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल, नायलॉन दोरी, मिरची पूड आदी हस्तगत करण्यात आले  आहे.