Tue, Apr 23, 2019 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनाथ मुलांची व्याख्या स्पष्ट करा

अनाथ मुलांची व्याख्या स्पष्ट करा

Published On: Jan 22 2018 1:48AM | Last Updated: Jan 22 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात 1 टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. मात्र सरकार ज्या मुलांना अनाथ म्हणून त्यांना  ही सवलत देणार आहे, त्याची नेमकी व्याख्या अगोदर ठरवावी, अशी मागणी राज्यात अनाथ मुलांसाठी कार्यरत असलेल्या संघटनांनी केली आहे. जर ही व्याख्या चुकीची ठरली तर त्याचा राज्यात मोठ्या प्रमाणावर गैरवापर होण्याची भीतीही व्यक्त केली.

अनाथांचा नावावर राज्यात खूप संस्था कार्यरत आहेत, मात्र नेमके यात खरोखर मूळ अनाथ आहेत, त्यांना कोणीही नाही अशा मुलांची संख्या ही एक हजारही मिळणे अवघड असल्याचे शांतिवन संस्थेचे संचालक दीपक नागरगोजे यांनी सांगितले. 

जी मुले लहानपणी बेवारस सापडली, त्यांना मोठ्या प्रमाणात दत्तक घेतले जाते. त्यामुळे संख्या मोठी आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही तीन-तीन वर्षे वाट पाहावी लागते.यामुळे अनेक दाम्पत्य नाराज असतात यात सुधारणा झाली पाहिजे असे मतही नागरगोजे यांनी व्यक्त केले.

राज्यात ज्या संस्था अनाथ मुलांसाठी काम करत आहेत, त्यांच्याकडे असलेल्या मुलांची वर्गवारी लक्षात घेतली तर अनेक मुलांना अनाथ म्हणता येत नाही, सरकारी आणि अनुदानित अनाथ आश्रमशाळा आदींमध्ये अनेक मुलांना पालक मिळतात.अनेक जण दत्तक घेतात. त्यामुळे बहुतेक मुले अनाथ राहात नाहीत. दुसरीकडे याच संस्थांमध्ये 18 वर्षे झाली की मुले बाहेर पडतात, त्यांना बर्‍याच प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागते, त्याचा विचार संस्थांकडून होत नाही आणि सरकारही करत नाही तर अनेक मुलांना पालक मिळतातही. यामुळे मूळ अनाथ कोण आहेत आणि त्याची स्पष्टता काय असावी हे सरकारने अगोदर करावी अशी मागणी सिस्कॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकार यांनी केली.