Sun, Mar 24, 2019 04:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंगावर किलोभर सोनं, तरीही वीजचोरी 

अंगावर किलोभर सोनं, तरीही विजचोरी 

Published On: Aug 08 2018 6:45PM | Last Updated: Aug 08 2018 6:45PMठाणे : प्रतिनिधी

भिवंडीत टोरंट पावर कंपनी व राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने कामतघरच्या निवासी भागात वीजचोरी प्रकरणी छापा टाकला. यावेळी पथकाच्या बिल्डरसह प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा कलाकार हे आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्यांच्याविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या वीजचोरांना पोलिसांनी अटक करून ठाणे जिल्हासत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोघा वीजचोरांना २१ ऑगष्टपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावली.

भिवंडी शहरातील कामतघर येथे बिल्डर सचिन प्रभुलाल ठक्कर याने निवासी इमारतीच्या समोरील विद्युत वाहिनीला थेट केबल जोडणी केली होती. तो वीजपुरवठा ऑर्केस्ट्रा फेम संतोष उर्फ दादूस म्हात्रे यांच्या घरात जोडणी करून दिला होता. 

या वीजचोरीची तपासणी टोरेंटच्या भरारी पथकाने करून बिल्डर सचिन ठक्कर व संतोष म्हात्रे यांना ३ लाख ६६ हजार रुपये बिल देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र वीज बिलाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करू लागल्याने नारपोली पोलिसांनी या दोघांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी हजर केले. 

यावेळी त्यांनी न्यायालयातही वीजबिल जमा करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे न्यायालयाने या दोघा वीज चोरांची रवानगी थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात केली आहे. न्यायालयाच्या कडक निर्णयामुळे विजचोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भिवंडीतील वीजचोरी विरोधात टोरंट पावर कंपनीने धडक कारवाई हाती घेतल्याने वीज चोरांमध्ये धडकी भरली आहे.