Fri, Feb 22, 2019 11:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत प्लास्टिक बाटलीला टेट्रा पॅकचा पर्याय!

मुंबईत प्लास्टिक बाटलीला टेट्रा पॅकचा पर्याय!

Published On: Apr 23 2018 1:58AM | Last Updated: Apr 23 2018 1:52AMमुंबई : प्रतिनिधी

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी मुंबईत सुरू असताना, प्लास्टिकबंद पाण्याच्या बाटल्यांचे काय ? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. प्लास्टिकबंदी पूर्णपणे राबवायची असेल तर, प्लास्टिक बाटल्यांना टेट्रा पॅकचा पर्याय निवडा, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. एवढेच नाही तर याबाबतचा पालिका सभागृहात मंजूर केलेला ठरावही राज्य शासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार आहे. 

प्लास्टिक बाटल्यांच्या विघटनाला लागणारा वेळ लक्षात घेऊन, या बाटल्या बंद करणे काळाची गरज असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाण्याच्या व कोल्ड्रींकच्या प्लास्टिक बाटल्या बंद करून त्याऐवजी टेट्रा पॅकचे वापर करण्याचे धोरण आखण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका आसावरी पाटील यांनी केली. तसा ठरावही नगरसेवकांनी पालिका सभागृहात मंजूर केला. टेट्रापॅकचे धोरण राबवणे योग्य आहे. पण हे धोरण निश्‍चित करण्याचा अधिकार पालिकेचा नसून तो राज्य सरकारचा आहे. त्यामुळे नगरसेवकांनी केलेला ठराव, राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मुंबईसह राज्यात प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिक वस्तू, थर्माकोल आदींवर बंदी आली आहे.  पण मुंबईत दररोज विकल्या जाणार्‍या 70 ते 80 लाख प्लास्टिक बंद पाण्याच्या बाटल्यांचा प्रश्न सुटलेला नाही. केवळ पाण्याच्या बाटल्या नाहीत तर, कोल्ड्रींकच्या प्लास्टिक बाटल्यांचा प्रश्न जैसे थे आहे. पालिकेने प्लास्टिक बाटल्यांवर पर्याय म्हणून मुंबईत 500 मशीन बसवून त्याचे कलेक्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला. यापैकी दोन मशिन महापालिका मुख्यालयाबाहेर ठेवण्यात आल्या आहेत. 

या दोन मशिनमध्ये गेल्या आठवडाभरात 6 हजाराहून जास्त बाटल्या जमा झाल्या. पण ही योजना खर्चिक असल्यामुळे प्लास्टिक बाटलीला टेट्रा पॅक हा पर्याय योग्य असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

पावसाळ्यात प्लास्टिकच्या बाटल्या गटार, नाले, मेनहोलमध्ये जाऊन अडकतात. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत आहे. 2017 मध्ये गटार व नालेसफाईच्या कामादरम्यान लाखो प्लास्टिकच्या बाटल्या सापडल्या होत्या.

Tags : Mumbai, plastic bottle, option, Tetra Pak, Mumbai news,