Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधकांचे शिवसेनेवर टीकेचे आसूड

विरोधकांचे शिवसेनेवर टीकेचे आसूड

Published On: Dec 30 2017 1:46AM | Last Updated: Dec 30 2017 1:12AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत कमला मिलमधील हॉटलमध्ये जे अग्‍नितांडव झाले, त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला हे सर्व जण मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत म्हणून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तर विरोधी पक्षाच्या अन्य नेत्यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत  मुंबईत नाईट लाईफ सुरू करण्याच्या भूमिकेवरून शिवसेनेवरही टीकेचे आसूड ओढले आहेत.

मुंबई शहर हे भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर उभे असून  आणखी किती जणांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागणार  आहे, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. या घटनेची आयुक्‍तांमार्फत चौकशी न करता सीबीआय चौकशी करण्याची मागणी करून शिवसेनेच्या नेत्यांच्या रूफ टॉप हॉटेलच्या धोरणामुळेच आगीच्या घटनांचा धोका वाढत असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.

उच्चस्तरीय चौकशी करा : चव्हाण 

आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमला मिलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असून महापालिकेच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

न्यायालयीन चौकशी करा : मुंडे

कमला मिल परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू असून महापालिका व राज्य सरकारच्या भ्रष्ट अधिकार्‍यांच्या कारभारामुळेच या घटना घडत असल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

याप्रकरणी न्यायालयीत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरू करणार्‍या सत्ताधार्‍यांना हे किती धोकादायक आहे याची कल्पना आली असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनीही याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

राजकीय प्रभावाखाली परवानग्या देणार्‍याचे नाव उघड करण्याची विनोद तावडेंची मागणी नियम डावलून केवळ राजकीय प्रभावाखाली पब व रेस्टॉरंटला परवानगी देणार्‍या व या दुर्घटनेला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, अशी मागणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या प्रभावाने या परवानग्या देण्यात आल्या, त्या राजकीय व्यक्‍तीचे नावही उघड झाले पाहिजे व त्याच्यावरही  समान न्यायाने कारवाई झाली पाहिजे, असेही तावडे यांनी म्हटले आहे.
सीबीआय चौकशी करा : निरुपम
या आगीची न्यायालयीन  किंवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरंच मुंबईकरांची चिंता असेल तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची  न्यायालयीन  किंवा सीबीआय चौकशीचे आदेश त्वरित द्यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. संजय निरुपम पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी साकीनाका येथेही अशीच आग लागली होती, त्यावेळी देखील 12 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता आणि आताही मुंबईतील दुसरी दुर्दैवी घटना आहे. 

या दोन्ही प्रकरणाला मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे त्यामुळे मनपा आयुक्त अजोय मेहता यांची देखील या घटनेला जबाबदार धरून हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे. कमला मिल आगप्रकरणात मनपाच्या 5 इंजिनीअरना निलंबित करण्यात आले हे चांगले झाले;परंतु तेथील वॉर्ड ऑफिसरवरही निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.