Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शून्य अपघातांचा संकल्प भंगलाच; मुंबईतील 60 गोविंदा जखमी  

दहीहंडी: मुंबईत एकाचा मृत्यू, ६० गोविंदा जखमी

Published On: Sep 03 2018 8:15PM | Last Updated: Sep 03 2018 11:15PMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईसह उपनगरांत मोठ्या जल्लोषात साजर्‍या झालेल्या दहीहंडी उत्सहादरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत एकूण 60 गोविंदा जखमी झाले तर  दहीहंडी  फोडण्यासाठी  लावण्यात आलेल्या दुसर्‍या थरावर उभ्या असलेल्या कुश अविनाश खंदारे (26) या गोविंदाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाला. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाच्या दहीहंडी उत्सवातही मुंबईच्या गोविंदा पथकांनी केलेला शून्य अपघातांचा संकल्प भंगल्याचे स्पष्ट झाले आहे. 40 जखमी गोविंदांवर वेगवेगळ्या पालिका रुग्णालयांत वैद्यकीय उपचार सुरू आहेत. 

दहीहंडी सणाचा थरथराट मुंबईसह उपनगरांत सोमवारी पहायला मिळाला. न्यायालयाने उंचीवरील बंदी हटवल्याने जय जवान, माझगाव ताडवाडी, शिवसाई मंडळ यांसह अन्य मोठ्या गोविंदा पथकांनी उंच मानवी मनोरे रचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात मुंबईत 60 गोविंदाना उंच थरांवरून पडून दुखापत झाल्याची अधिकृत माहिती मुंबई महानगरपालिकेने जाहीर केली. या गोविंदांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. 20 जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या आपात्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या गोविंदांना तातडीने जवळच्या रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. मुंबईतील जे. जे रूग्णालय, केईएम रूग्णालय, नायर रूग्णालय आणि राजावाडी शिवाय इतर काही रूग्णालयांमद्ये गोविंदांवर उपचार सुरू आहेत. 

जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे म्हणाले की, सध्या जे.जे. रूग्णालयात 3 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. यामधील एक गोविंदा कुलाब्यातील असून त्याच्या कपाळाला मार लागलाय. तर घाटकोपरमधील 37 वर्षीय व्यक्तीला डोक्याला मार लागलाय. 30 वर्षीय अन्य एका व्यक्तीच्या पायाला दुखापत झाली असून त्याला चालताना त्रास होतोय. या सर्वांवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोविंदांची आकडेवारी

केईएम रूग्णालय- 4

नायर रूग्णालय- 7

सायन रूग्णालय- 2

एस.एल रहेजा रूग्णालय- 1

एम.टी अग्रवाल रूग्णालय- 2

राजावाडी रूग्णालय- 7

ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4

महात्मा फुले रूग्णालय- 1

व्ही. एन. देसाई रूग्णालय- 4

भाभा रूग्णालय- 5

पोद्दार रूग्णालय- 2

सेंट जॉर्ज हॉस्पिटल-1