Fri, Jul 19, 2019 07:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने कामगार जखमी

ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने कामगार जखमी

Published On: Feb 08 2018 4:25PM | Last Updated: Feb 08 2018 4:25PMडोंबिवली : वार्ताहर
इमारतीवरील शेडसाठी लोखंडी अँगल टाकण्याचे काम सुरू असताना हाय व्होल्टेज ओव्हरहेड केबलशी संपर्क आल्याने अकुशल नाका कामगार जखमी झाला. ही दुर्घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये घडली. घटना घडल्यानंतर मोठा आवाज झाला यामूळे  परिसरात एकच खळबळ उडाली. 


भागीरथ बुधा खाडे (20) असे या कामगाराचे नाव असून त्याच्यावर निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रोबेस कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या दुर्घटनेच्या घटनास्थळापासून काही अंतरावर रामदास तांबे यांच्या मालकीची एक मजली इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर साईलीला नामक हॉटेल असून ते सद्या बंद अवस्थेत आहे. मात्र याच हॉटेलच्या टेरेसवर पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम शिवराम ठवळे नामक मांडा-टिटवाळ्यात राहणाऱ्या नाका कामगाराने घेतले आहे.


शिवराम ठवळे याच्यासह आंबिवली येथे राहणारा राकेश कुशवाह आणि कसारा येथे राहणारा भागीरथ खाडे असे तिघेजण शेड बांधणीचे काम करत होते. दुपारी 12 च्या सुमारास या शेडसासाठी लागणारा लोखंडी अँगल वेल्डींगसाठी हलविताना भागीरथ खाडे याच्या हातून निसटला आणि थेट सदर इमारतीच्या शेजारून जाणाऱ्या 22 किलो व्होल्टेजच्या उघड्या केबालला लागला. उच्च दाब असलेल्या जिवंत विद्युत वाहिनीशी लोखंडी अँगलचा स्पर्श होताच कानठळ्या बसविणारा आवाज झाला. 


परिणामी या दुर्घटनेत भागीरथ खाडे हा जबर होरपळला. शिवाय इमारतीवरून फेकला गेल्याने पत्रे तुटून खाली कोसळला. शौचालयाच्या गॅपमध्ये आदळल्याने त्याच्या डोक्यास जबर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. मोठा गलका झाल्याने आसपासचे लोक धावून आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भागीरथ याला तात्काळ उचलून निवासी विभागातील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. छाती, हात, पोटाला भाजलेल्या या कामगाराच्या डोक्याला जबर दुखापत झाली. या संदर्भात माहिती देताना तेथिल डॉक्टर सुप्रिया रंगास्वामी म्हणाल्या, रूग्णाच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन मेंदूपर्यंत इजा पोहोचली आहे. डोक्याला 8 टाके घालण्यात आले आहेत. रूग्ण सध्या कोमात असून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोमातून बाहेर कधी येईल, हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही डॉ. सुप्रिया यांनी सांगितले. 


याच दरम्यान स्थानिक मानपाडा पोलिसांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पाहणी करून पंचनामा केला. या दुर्घटनेत नेमका दोष कुणाचा, याचा तपास करण्यात येत आहे. या संदर्भात बोलताना महावितरणच्या एमआयडीसी विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ बेल्ले म्हणाले, घटनास्थळाच्या इमारतीपासून 22 किलो व्होल्टेजची ओव्हरहेड केबल जात आहे. दुर्घटनेनंतर या परिसराचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडीत करण्यात आला आहे. केबलखाली असलेला अँगल बाजूला काढून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला असल्याचे बेल्ले यांनी सांगितले.