Fri, Mar 22, 2019 01:30
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : रम्य समुद्र किनाऱ्यावरील हरिहरेश्वर 

रायगड : रम्य समुद्र किनाऱ्यावरील हरिहरेश्वर 

Published On: Aug 16 2018 12:20AM | Last Updated: Aug 22 2018 8:19AMदांडगुरी (जि. रायगड) : श्रीकांत शेलार  

रायगड जिल्ह्याला लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर हरिहरेश्वर हे शहर वसले आहे. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे रम्य समुद्रकिनारा आणि तेथेच असलेले हरिहरेश्वरचे मंदिर. हे मंदिर  दिवेआगार आणि श्रीवर्धन दोन समुद्रकिनाऱ्यांच्या मधोमध आहे. 

राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वरला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांची मांदियाळी पहायला मिळते.  पावसातही या महिन्यात हजारो भाविक दर्शनासाठी हरिहरेश्वर येथे दर्शन घेण्यासाठी रांगा लावत असतात.

प्रत्येक श्रावन सोमवारी पहाटेपासूनच मंदिरात भाविक मोठी गर्दी करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या स्वागतासाठी अधूनमधून पावसाच्या सरी सुरु असतात.

एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्‍या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही हेतू हरिहरेश्वरला आल्यावर साध्य होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व ४८ मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. 

या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण १०८ तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख 'श्री हरीहरेश्वर माहात्म्य' पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. 

सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. शंकर व पार्वती यांचे एकत्रित दर्शन घेण्यासाठी उभयतांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखीच रचना हरिहरेश्वराच्या लिंगावरही आहे असे दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रामधुन आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे.

या प्रदक्षिणा मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणावर पाहायला मिळते. 

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरला जसे धार्मिक महत्व आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही हे शहर समृध्द आहे. या शहराला दोन समुद्र किनारे लाभले आहेत. एक दिवेआगारचा आणि दुसरा श्रीवर्धन. हरिहरेश्वर पुण्यापासून १९० किमी आहे तर मुंबईपासून हे अंतर २१० किमी आहे. त्यामुळे येथे आठवड्याची सुट्टी घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असातात. त्यांच्या सोईसाठी बीच रिसॉर्ट आहेत.  महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे रिसॉर्ट देखील तेथे आहे. 

Image may contain: sky, house and outdoor

 

Image may contain: ocean, sky, beach, outdoor, nature and water

 

Image may contain: ocean, sky, outdoor, nature and water