Thu, Sep 20, 2018 17:58



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार ‘शिव राज्याभिषेक’

प्रजासत्ताक दिनी राजपथावर अवतरणार ‘शिव राज्याभिषेक’

Published On: Jan 01 2018 6:55PM | Last Updated: Jan 01 2018 6:55PM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

राजपथावर प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेका’ वर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. देशाच्या 69 वा प्रजासत्ताक दिनी इंडियागेट वरील राजपथावर देशातील 14 राज्यांचे चित्ररथ प्रदर्शित होणार आहेत. 

देशभरातून एकूण 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती पैकी विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 14 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे.  

दरवर्षी राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुणे यांच्यासह गणमान्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात भारत देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्टये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलानात बहुतांश वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवत यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होणार आहे. 

राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कुल ऑफ आर्ट चे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देखना चित्ररथ उभारला जाणार आहे.

चित्ररथावर रायगड किल्यावर असलेली ‘मेघडंबारी’ उभारण्यात येणार असून शिवराज्याभिषेक दर्शविण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीकेतील कलाकारासह चित्ररथावर एकूण 10 कलाकार असतील. चित्ररथाच्या उजव्या आणि डाव्या बाजुला विविध प्रतिमांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा  दर्शविण्यात येणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगौरव वर्णन करणा-या गिताची धूनही राजपथावर या चित्ररथासह सादर होणार आहे.

यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता यास प्रथम पारितोषीक मिळाले होते. 1983 मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला आहे.