Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार

अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार

Published On: Mar 18 2018 1:29AM | Last Updated: Mar 18 2018 1:16AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार हे आता स्पष्ट झाले असून विधिमंडळ अधिवेशन संपताच हा विस्तार केला जाणार आहे. शक्यतो एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात हा विस्तार केला जाणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. 6 एप्रिल रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे मुंबई येत असून त्या दरम्यान हा विस्तार होईल, अशी चर्चा आहे. विस्तारात विनायक मेटे, आशिष शेलार, प्रशांत ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अनेक वेळा जाहीर करण्यात आला. मात्र, दरवेळी हा विस्तार या ना त्या कारणाने पुढे गेला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून शिवसेनेने युती तोडण्याची धमकी दिल्यानंतर तर विस्ताराचा तिढा जास्तच वाढला. शेवटी राणेंना भाजपने राज्यसभेवर पाठविल्याने राणेंच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न निकाली निघाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. येत्या वर्षभरात लोकसभा तर दीड वर्षावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. कदाचित दोन्ही निवडणुका एकाचवेळीही होतील. त्यामुळे विस्तार आणि काही फेरबदल करून मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा चेहरा बदलू शकतात. 

फारसा प्रभाव पाडू न शकलेल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री डच्चू देऊ शकतात. तसेच काही मंत्र्यांच्या खात्यातही फेरबदल केला जाऊ शकतो. 6 एप्रिल रोजी भाजप अध्यक्ष अमित शहा हे मुंबईत येणार असून त्यांच्या उपस्थितीत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. त्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.

Tags : Vinayak, Mete, Ashish, Shelar, Prashant, Thakur, involvement, possibility, mumbai news