होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उरणमध्ये सात तर, दिघीच्या चार बोटी बुडाल्या

ओखी वादळचा रायगडाला फटका; ११ बोटी बुडाल्या

Published On: Dec 04 2017 5:34PM | Last Updated: Dec 04 2017 5:38PM

बुकमार्क करा

 

उरण/दिघी : राजकुमार भगत/अभय पाटील

तामिळनाडू आणि केरळमध्ये हाहाकार उडवून देणारे ओखी चक्रीवादळचा फटका रायगड किनार्‍याला बसला असून, या वादळामुळे उरणमध्ये सात तर दिघीमध्ये चार बोटी बुडाल्या आहेत. वादळामुळे समुद्रात लाटांचा वेग वाढला असून, किनार्‍याला असलेल्या बोटींना जोरदार लाटांचा तडाखा बसला आहे. यात या सात बोटी समुद्रात बुडाल्या. यातील सहा बोटींचा शोध लागला असून, एका बोटीचा शोध अद्याप सुरु आहे. मात्र, सर्व मच्छिमार सुखरूप परतल्याचे मत्स्य विभागाने सांगितले आहे. 

वादळ गोवा व महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधूदूर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर घोंगावत आहे. उरण तालुक्यातील दांडा, माणकेश्‍वर समुद्र किनार्‍यावर या वादळाच्या तडाख्याने सात बोटी बुडाल्या आहेत. तर दिघी समुद्रात चार बोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे. ओखी वादळाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा आणि कोकण किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगड जिल्हा आपत्कालीन विभागातर्फे देखील धोक्याचा इशारा दिला होता. रविवारी ३ डिसेंबर रोजी रात्री या वादळाचा फटका रायगडच्या किनारपट्टीला बसण्यास सुरुवात झाली आहे. यात उरणच्या माणकेश्‍वर समुद्र किनारी नांगरण्यात आलेल्या सात मच्छीमार बोटोंना जलासमाधी मिळाली आहे. याबुडालेल्या बोटींपैकी सहा बोटी बाहेर काढण्यात मच्छीमारांना यश आले असून, एका बोटींचा शोध सुरू आहे. बुडालेल्या बोटींमध्ये चार यांत्रिक बोटी आणि तीन बिगर यांत्रिक बोटी होत्या. मच्छिमारांनी कोणाचीही मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतःच समुद्रातून या बुडालेल्या बोटी शोधून किनार्‍यावर आणल्या. एक बोट समुद्राला आलेल्या उधाणामुळे शोधता आली नाही. सुरक्षेच्या दृष्टीने या बोटी मोरा व करंजा बंदरात हलविण्यात आल्या आहेत. 

येत्या ४८ तासांत या वादळाचा मोठा फटका रायगड किनारपट्टीला बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, वादळाच्या तडाख्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सागरी सुरक्षा रक्षक, तहसील कार्यालय, पोलीस यंत्रणा व तटरक्षक दलाकडून विशेष टेहाळणी करण्यात येत आहे.