Thu, Apr 25, 2019 04:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जानकर, मेटे, खोत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबद्दल विरोधकांनी घेतला आक्षेप

जानकर, मेटे, खोत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाबद्दल विरोधकांनी घेतला आक्षेप

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 15 2018 1:19AMमुंबई : प्रतिनिधी

राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि विधान परिषद सदस्य विनायक मेटे यांच्या सदस्यत्वाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पक्षांचे पदाधिकारी म्हणून त्यांची नोंद आहे. त्यामुळे ते घटनात्मकदृष्ट्या भाजपाचे सदस्य म्हणून सभागृहात कसे उपस्थित राहू शकतात. यासंदर्भात सभागृहात माहिती देण्यात यावी, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहनेते तसेच निवडणूक विभागाचे अधिकारी यांच्याशी याबाबत चर्चा करून माहिती घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल यांच्याकडूनही माहिती घेण्यात येईल असे स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान नारायण राणे यांच्या पक्ष सदस्यत्वाबाबत शिवसेनेचे अनिल परब यांनी जो मुद्दा उपस्थित केला. त्याचा संदर्भ घेत हरकतीच्या मुद्याद्वारे शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेत हा विषय मांडला. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे व पूर्वी स्वा भिमानी पक्षाचे (आता रयत क्रांती संघटना) प्रतिनिधित्व करणारे सदाभाऊ खोत ज्यांचा स्वत:चा राजकीय पक्ष आहे, ही मंडळी भाजपचे सदस्य म्हणून विधान परिषदेवर कसे निवडून येऊ शकतात, असा प्रश्‍न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील एका पक्षाचा सदस्य दुसर्‍या पक्षाचा सदस्य म्हणून सभागृहात कसा बसू शकतो, असा प्रश्‍न केला.