Tue, Jul 23, 2019 02:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालय आहे की, सर्कशीचा फड : धनंजय मुंडे

मंत्रालय आहे की, सर्कशीचा फड : धनंजय मुंडे

Published On: Feb 12 2018 8:30PM | Last Updated: Feb 12 2018 8:50PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्‍महत्‍या करण्याचे प्रकार टाळण्यासाठी मंत्रालयात नायलॉनच्या जाळ्या लावण्यात आल्‍या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात आत्महत्या करण्याचे प्रयत्न झाल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. मंत्रालयाने केलेल्या या उपायावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, 'हे मंत्रालय आहे की, सर्कशीचा फड? अरे कुठे नेऊन ठेवले प्रशासन?. लोकांनी आत्महत्या करू नये म्हणून केलेली उपाय योजना चांगली आहे. मात्र, अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सरकारने करायला हवेत'. हे सरकारचे विकासाचे मॉडेल आहे का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

गेल्याच आठवड्यात मंत्रालयाच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारत सुरेश रावते या तरुणाने आत्महत्या केली होती. सुरेशने मंत्रालयावरून उडी मारल्‍यानंतर उपचारासाठी त्याला रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषित केले होते. 

अहमदनगरमधील अविनाश शेटे याने कृषी अधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्यानंतर या परीक्षेबाबत सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी अविनाश शेटे वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारत होता. अखेर वैतागलेल्या अविनाशने मंत्रालयाबाहेर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्‍यानंतर त्‍याचा पेपर परत तपासण्याचे आश्वासन दिले होते. त्‍याआधी मंत्रालयात विष प्राशन केलेले ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचाही मृत्यू झाला. संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी पाटील यांनी मंत्रालयात अनेक वेळा खेटे घातले होते. मात्र, त्‍यांना न्याय मिळाला नाही त्‍यामुळे त्‍यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते.

मंत्रालयात सतत होत असलेल्‍या आत्‍महत्‍यांच्या घटनेची मंत्रालय प्रशासनाने गंभीर दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या इमारीच्या लॉबीबाहेर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे प्रत्यक्ष काम सोमवारी सुरु करण्यात आले. याबाबत जाळी लावल्याचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यांनी सरकारच्या कामावर टीका केली.