Sun, Jul 21, 2019 01:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट प्रवाशांची संख्या २० लाखांपर्यंत घसरली!

बेस्ट प्रवाशांची संख्या २० लाखांपर्यंत घसरली!

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:07AMमुंबई : प्रतिनिधी 

एकेकाळी बेस्टच्या बसने दररोज 47 लाख प्रवासी प्रवास करत होते. यात आता मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. वर्षभरापुर्वी बेस्टच्या प्रवाशांची संख्या 28 लाखाच्या घरात होती. या संख्येत मोट्याप्रमाणात घसरण होत, जानेवारी 2018 मध्ये ही संख्या तब्बल 20 लाखाच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीतून जाणार्‍या बेस्टचे भवितव्य धोक्यात आले आहे.

मुंबई शहराची रक्तवाहिनी समजल्या जाणार्‍या बेस्टची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस कमकूवत होत आहे. त्यात आता प्रवाशांनीही पाठ फिरवण्यास सुरूवात केल्यामुळे शतक पुर्ण करणारा हा उपक्रम तग धरणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 12 ते 15 वर्षापुर्वी बेस्टच्या बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या दररोज 47 लाखाच्या घरात होती. त्यानंतर भाड्यामध्ये झालेली वाढ, शेअर रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर व अन्य प्रवासी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या घटत आहे. 2017 मध्ये प्रवाशांची संख्या 28 लाखाच्या घरात होती. आता हीच संख्या 20 लाखाच्या घरात आली आहे. बेस्टने जानेवारी 2018 मध्ये बसने प्रवास केलेल्या प्रवाशांची आकडेवारी प्रसिध्द केली आहे. यात जानेवारी महिन्यात 5 कोटी 99 लाख 38 हजार 645 प्रवाशांनी प्रवास केला. याचाच अर्थ दररोज सरासरी 20 लाखापेक्षा कमी लोकांनी प्रवास केल्याचे सिध्द होते. 

या प्रवाशांमध्ये 5 कोटी 73 लाख 31 हजार प्रवासी पुरूष व महिला होते. तर 21 लाख 40 हजार मुलांनी प्रवास केला. यात 4 किमी पर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांची टक्केवारी 62 टक्केच्या घरात आहे. यात 2 किमी प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 1 कोटी 9 लाख तर 4 किमीचा प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या 2 कोटी 64 लाख इतकी आहे. प्रवाशांची अचानक घटलेल्या संख्येमुळे बेस्ट प्रशासनाला हादरा बसला आहे. 

Tags : mumbai news, best passenger, number,  20 lakh,  dropped,