होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनधिकृत बांधकामांवर आता आकाशातून नजर

अनधिकृत बांधकामांवर आता आकाशातून नजर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेने सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवणे सहज शक्य होणार आहे. यासाठी लागणार्‍या खर्चाचा अंदाज घेऊन, लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले.

अनधिकृत बांधकामांचे माहेरघर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील अनधिकृत बांधकाम व झोपड्यांकडे लक्ष ठेवणे पालिकेला शक्य न झाल्यामुळे झोपड्यांची संख्या एक ते दीड लाखाने वाढली आहे. पूर्वी धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी होती. आज बांद्रा, घाटकोपर, अंधेरी, मानखुर्द, कुर्ला, शिवाजी नगर, गोवंडी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली आदी भागांत धारावीपेक्षाही मोठ्या झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहेत. हे रोखण्यासाठी मुंबई सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. याबाबत जानेवारी 2015 मध्ये पालिका सभागृहात तत्कालीन नगरसेवक परमिंदर सिंग भमरा यांनी सॅटेलाईट तंत्रज्ञानाची मागणी केली. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने आपला अभिप्राय विधी समितीत सादर केला  आहे. सॅटेलाईट इमेजेस मिळवण्याचा सल्‍ला होता.

मात्र प्रयत्न करूनही अनधिकृत बांधकामांच्या अद्ययावत इमेजेस मिळाल्या नाहीत. सॅटेलाईट इमेजेस मिळवून देणार्‍या व त्याचे विश्‍लेेषण करणार्‍या शासनमान्य संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांची संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून, या संस्थांकडून  सॅटेलाईट इमेजेस घेणे व त्याचे विश्‍लेषण करणे आदीसाठी येणार्‍या खर्चाचा अंदाज काढून तसा प्रस्ताव स्थायी समितीत सादर करण्यात येणार आहे, असेही अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले. 

Tags : mumbai, mumbai news, unauthorized construction, now look from the sky, 


  •