Thu, Jul 18, 2019 00:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बीकेसीतील सायकल स्टँडला परवानगी नाही

बीकेसीतील सायकल स्टँडला परवानगी नाही

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:21AMमुंबई : प्रतिनिधी 

वांद्रे स्थानकापासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत (बीकेसी) या मार्गावर सायकल ट्रॅक उभारण्याची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने फेटाळून लावली आहे. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने कर्मचार्‍यांसाठी सायकल स्थानक उभारण्याची मागणी बीकेसीमधील कर्मचार्‍यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) तत्कालीन महानगर आयुक्त यू.पी.एस.मदान यांच्याकडे केली होती. मात्र या ठिकाणी मेट्रो-2 आणि इतर प्रकल्प येत असल्याने सायकल ट्रॅकसाठी आणि सायकल स्थानकासाठी जागा सध्या उपलब्ध करून देता येणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. 

बीकेसीमध्ये बहुतांश कंपन्यांची मुख्यालये आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच या मार्गावर रिक्षाने प्रवास करण्यासाठीही जास्त पैसे मोजावे लागतात.  कर्मचार्‍यांनी सायकल वापरली तर इंधनाची बचत होऊन प्रदूषणही टाळता येऊ शकते, असे कर्मचार्‍यांचे म्हणणे होते. बीकेसीमध्ये मेट्रो-2 बी, मेट्रो-3, कलानगर जंक्शन उड्डाणपूल आणि मिठीनदी यांचा विकास करत असल्याचे सांगत सायकल ट्रॅकची शक्यता तूर्तास संपुष्टात आणली.

बीकेसीमध्ये जागतिक वित्त आणि व्यापार केंद्रासाठी प्रस्ताव निश्‍चित करण्याची कार्यवाही होत आहे. त्यानंतरच या परिसरात स्ट्रीट फर्निचर आणि सायकल स्थानक यांचे धोरण निश्‍चित करण्यात येईल, असे एमएमआरडीए प्रशासनाने स्पष्ट केले आहे.