Tue, Jul 23, 2019 18:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अखेर अपंग, अंधांना पेन्शन नाहीच

अखेर अपंग, अंधांना पेन्शन नाहीच

Published On: Jan 21 2018 2:50AM | Last Updated: Jan 21 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील अपंग व अंध व्यक्तींना मासिक 2 हजार 500 रुपये पेन्शन देण्यासाठी भाजपाने आग्रह धरला आहे. महापालिकेच्या कर्तव्य सूचीमध्ये अपंग व अंध व्यक्तींना पेन्शन देण्याची तरतूद नाही. पण त्यांच्यासाठी राखीव असलेल्या 3 टक्के निधीतून कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्याचे सांगत, पालिका प्रशासनाने भाजपाची मागणी फेटाळून लावली. 

अपंग व अंध व्यक्ती इच्छा असूनही काहीच काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. याकडे भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी 2016 मध्ये पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शेट्टी यांची ही मागणी उचलून धरत, भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी हा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांसमोर ठेवला होता. पण पालिका प्रशासनाने सध्या तरी 2 हजार 500 रुपये पेन्शन देणे शक्य नसल्याचा अभिप्राय दिला आहे. हा नकार देत असताना पालिकेतर्फे अपंगांना देण्यात येणार्‍या सेवा-सुविधांची यादी पालिकेने गटनेत्यांसमोर ठेवली. 

शासन निर्णयाप्रमाणे अपंगांना मोफत प्रवास योजना पालिका राबवत असून 2017-18 या आर्थिक वर्षात यासाठी 6 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या  व्यतिरिक्त दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी 3 टक्के बंधनकारक खर्चातून स्वयंरोजगारासाठी 3 कोटी रुपये व प्रशिक्षण 20 लाख रुपये खर्च करण्यात येतात. एवढेच नाही तर दिव्यांग व्यक्तींसाठी साईड रिअर व्हिलसह स्कुटरसाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनचे देणे पालिकेला शक्य नसल्याचे पालिकेच्या नियोजन विभागाकडून सांगण्यात आले.