Wed, Apr 24, 2019 15:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युती तुटण्याची अफवाच; पण यापुढे एकत्र नाही!

युती तुटण्याची अफवाच; पण यापुढे एकत्र नाही!

Published On: May 31 2018 6:29PM | Last Updated: May 31 2018 6:39PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रात भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यात सर्व काही अलबेल नसल्याचेच सातत्याने पुढे आले आहे. पालघर पोटनिवडणुकीत संबंध ताणले गेले आणि त्यानंतर पुन्‍हा एकदा युती तुटण्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, या सर्व अफवाच असल्याचे आज, गुरुवारी  पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले. उद्धव यांनी मुंबईतील शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत युतीबाबत कोणतीही मोठी भूमिका घेतली नाही, त्यामुळे पुन्‍हा एकदा युती तुटण्याबाबतच्या चर्चांचा फुगा फुटला.

पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जोरदार चिखलफेक झाली. शिवसेनेने मुख्यमंत्र्याची ऑडिओ क्‍लिप व्‍हायरल करून खळबळ माजवली होती. त्यातच मुख्यमंत्र्यांनीही सभेत पूर्ण क्‍लिप ऐकवून शिवसेनेला कधी नव्‍हे ते जशास तसे प्रत्युत्तर दिले. तसेच पैसे वाटप प्रकरण, भाजपचा उमेदवार फोडून शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देणे, या सर्व प्रकारांमुळे युतीचा संसार आता टिकणार नाही, अशाच शक्यता व्यक्‍त होत होत्या. परंतु, आजच्या पत्रकार परिषदेत या सर्व शक्यता फोल ठरल्याचे दिसून आले.

 

►पालघर पोटनिवडणुकीत घोळ, यंत्रणा भ्रष्‍ट : उद्धव ठाकरे

उद्धव पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर झाल्यापासूनच ते मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, उद्धव यांनी आगामी काळात सर्व निवडणुका स्‍वबळावर लढणार असल्याचे पुन्‍हा एकदा जाहीर केले. तसेच यापुढे कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचे सांगितले. युती तोडण्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उद्धव यांनी पुन्‍हा एकदा बगल दिली. 

पत्रकारांनी वारंवार युतीबाबत प्रश्न केल्यानंतर उद्धव यांनी त्याच्यापेक्षा इतर प्रश्न महत्त्‍वाचे असल्याचे सांगितले. तसेच देशात अनेक इतर महत्त्‍वाच्या समस्या असून त्यावर चर्चा व्‍हावी, असेही उद्धव म्‍हणाले.