Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गडकरी म्हणतात, डोंबिवली बकाल; नागरिक बेजबाबदार 

गडकरी म्हणतात, डोंबिवली बकाल; नागरिक बेजबाबदार 

Published On: Mar 10 2018 6:36PM | Last Updated: Mar 10 2018 6:36PMडोंबिवली : वार्ताहर
डोंबिवली हे घाणेरडे शहर आहे. शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे, रस्ते अरुंद आहेत. नेतेमंडळींनी अनेक अवैध बांधकामे केली आहेत. मात्र, या सर्व परिस्थितीला नागरिक जबाबदार आहेत, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने स्थानिक पातळीवर एकच खळबळ माजली आहे.

डोंबिवलीतील एका कार्यक्रमात गडकरी यांनी वेबीनॉरच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थीनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर सेना-भाजपाची सत्ता आहे. रविंद्र चव्हाण हे भाजपचे स्थानिक आमदार असून सद्या ते राज्यमंत्री पदावर कार्यरत आहेत. तत्कालीन केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या देशातील 73 स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण-डोंबिवली शहराला अखेरच्या 10 शहरांत स्थान मिळाल्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरावर अस्वच्छ शहराचा शिक्का बसला आहे. अशी परिस्थिती असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कल्याण-डोंबिवलीच्या सत्ताधारी नेत्यांना घरचा आहेर देऊन टाकला. 

गडकरी म्हणाले, 'सरकारकडून मेट्रो रेल्वे, जल वाहतूकीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच विविध रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या सगळ्याचा योग्यरित्या उपयोग करून टिटवाळा, माळशेज या भागात स्मार्ट व्हिलेजची निर्मिती होणे गरजेचे आहे. डोंबिवलीत शहरातील समस्या भयानक आहेत. साक्षात परमेश्वर आला तरी या समस्या सुटणार नाहीत. तरीदेखील भाजपा सरकार त्यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे गडकरी यांनी सांगितले. रस्त्यांचे जाळे विणले की प्रगती होते. ज्याठिकाणी रस्ते होतात तिथे टाऊनशीप होतात, इंडस्ट्री आणि महाविद्यालये येतात. त्यामुळे स्मार्ट शहर आकाराला येते. तुमच्या शहरातील 8 टक्के प्लॅस्टिक डांबरीकरणात टाकू शकता. भारत सरकारतर्फे त्यांचे नोटिफिकेशन लावले आहे. आता हे औपचारिक झाले आहे. तुमच्या येथील महिला बचतगटाच्या माध्यमातून प्लॅस्टिक गोळा करा. डांबराचा भाव 45 रूपये इतका आहे. प्लॉस्टिकचा दर 1 रूपये किलो आहे. त्यासाठी महापौरांना विश्वासात घ्या.'

कल्याण-डोंबिवलीतील 8 टक्के प्लॉस्टिक डांबरात टाकल्यावर येथील प्लॅस्टिकचा प्रश्न सुटेल. पर्यावरणाच्यादृष्टीने हा चांगला निर्णय ठरेल. त्यासाठी तुम्ही तुमच्या महापौरांकडे पाठपुरावा केला पाहिजे, असे गडकरी यांनी सांगितले.