Sat, Jul 04, 2020 08:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज धडकणार चक्रीवादळ 

आज धडकणार चक्रीवादळ 

Last Updated: Jun 03 2020 1:14AM
मुंबई/पुणे ः पुढारी वृत्तसेवा

बंगालच्या उपसागरातून ‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ दक्षिण गुजरात, कोकण व उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने प्रचंड वेगाने निघाले असून, ते कोकणात बुधवारी 3 जून रोजी दुपारी पोहोचणार आहे. या वादळाचे रूपांतर अवघ्या काही तासांत महाचक्रीवादळात होईल. मुंबईच्या अगदी जवळून जात हे चक्रीवादळ अलिबागवर धडकणार असल्याने कोरोनाशी झुंजणार्‍या मुंबईसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बीकेसीच्या मैदानावर उभारलेल्या देशातील सर्वात मोठ्या खुल्या कोरोना रुग्णालयातील रुग्णांना तातडीने हलवण्यात आले असून, पालघर जिल्ह्यातही 22 गावांतील 21 हजार रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

पालघरच्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांना या वादळाचा मोठा धोका असल्याने 21 हजारांवर गावकर्‍यांचे स्थलांतर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.  
हे वादळ 3 जून रोजी दुपारी 3 च्या सुमारास दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर धडकेल आणि त्याचा मुक्‍काम कोकण व उत्तर महाराष्ट्रात 24 तास राहणार असल्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व भागांना मोठे नुकसान होऊ शकते. पूर, वीजतारांचे मोठे नुकसान, झाडपडी, केळी, पपईच्या बागा व समुद्री पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

या वादळाचा वेग गुजरात व महाराष्ट्रात येईपर्यंत ताशी 100 ते 120 कि.मी. इतका वाढणार असून, महाराष्ट्रात दुपारी 2 ते 4 च्या सुमारास हे चक्रीवादळ येणार आहे. याचा वेग कर्नाटकपर्यंत ताशी 60 ते 80 कि.मी.  राहील, तेथून पुढे मात्र याचा वेग ताशी 100 ते 120 कि.मी.वर जाईल.हे वादळ प्रथमच राज्याची राजधानी मुंबईला मोठा फटका देण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रणगुरी, नाशिक, तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबारला प्रचंड वारे, विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस आणि पूर येऊ शकतो.