Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डावखरेंची राष्ट्रवादीतून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

डावखरेंची राष्ट्रवादीतून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

Published On: May 23 2018 5:31PM | Last Updated: May 23 2018 5:31PMमुंबई : प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेल्या अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदार पदाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. या त्यांच्या राजीनामा सत्रामुळे डावखरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून ६ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

निरंजन डावखरे यांना आमदारकीच नाही तर त्यांच्यावर विश्वास टाकून विदयार्थी व युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देवून राज्याचे नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यासाठी आजपर्यंत अनेक उपलब्ध जागा आणि संधी देवूनही त्यांनी केवळ संधीसाधूपणामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्यांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.

निरंजन डावखरे यांचा संधीसाधूपणाचा इतिहास बघता ते जिथे कुठे जाणार असतील त्या पक्षाला त्यांच्या या संधीसाधूपणाचा फटका केव्हातरी बसेल असा इशाराही शिवाजीराव गर्जे यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निरंजन डावखरे यांना पहिल्या वेळेस वय भरत नसल्याने उमेदवारी दिली नव्हती. मात्र, वय भरल्यानंतर विधानपरिषदेची आमदारकी त्यांना दिली. 

एकाच वेळी मुलगा आणि वडील विधानपरिषदेचे आमदार बनवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले. कै. वसंतराव डावखरे यांना पक्ष स्थापनेपासून आणि संकटात असताना पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. वसंतराव डावखरे यांना प्रदिर्घ काळ विधानपरिषदेचे उपसभापतीपद आणि उपाध्यक्षपद पक्षाने दिले होते असे असतानाही पक्षाने अन्याय केला म्हणणे योग्य नसल्याचेही गर्जे यांनी म्हटले आहे.

Tags : niranjan davkhare, Removed, ncp party, 6 years