होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपाची रात्रबाजाराची योजना सेनेने रोखली!

भाजपाची रात्रबाजाराची योजना सेनेने रोखली!

Published On: Dec 07 2017 2:15AM | Last Updated: Dec 07 2017 2:07AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईत रात्रबाजार सुरू करण्यासाठी भाजप आग्रही आहे. पण हॉटेलच्या गच्चीवरील पार्टी प्रस्तावाला विरोध करणार्‍या भाजपाचा रात्र बाजाराचा प्रस्ताव पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने रोखून धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन वषार्ंपासून हा प्रस्ताव पालिका सभागृहात धूळखात पडून आहे. 

 मुंबई व उपनगरांत रात्रबाजार सुरू करण्याची मागणी 2014 मध्ये भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केली होती. 8 जुलै 2015 मध्ये विधी समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पण पालिका सभागृहात हा प्रस्ताव गेल्या दोन वषार्ंपासून शिवसेनेने रोखून धरला आहे. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीच्या प्रस्तावाला भाजपाचा जोरदार विरोध आहे. गच्चीवरील पार्टीचा प्रस्ताव काँग्रेसला साथ देत भाजपाने रोखल्यामुळे रात्रबाजार या संकल्पनेला विरोध असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक खाजगीत सांगत आहेत. तर दुसरीकडे रात्र बाजारमुळे सुरक्षेचा धोका निर्माण होईल असे कारण पुढे करत, प्रस्ताव रोखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पर्यटनाला चालना देण्यासह नेहमी व्यस्त असलेल्या मुंबईकरांना कामावरून सुटल्यानंतर रात्री खरेदी करता यावे, यासाठी रात्रबाजाराची संकल्पना राबवल्याचे भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

शिवसेनेला हॉटेलच्या गच्चीवरील पार्टीला होणार धिंगाणा चालतो, सामान्यांसाठी असलेला रात्रबाजार नको, असा आरोप भाजपाने केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांच्या अधीन राहून रात्रबाजार सुरू करावा, इतकीच भाजपाची मागणी असल्याचे अमित साटम यांनी सांगितले. दरम्यान पालिका सभागृहात पुन्हा एकदा रात्रबाजाराचा प्रस्ताव मंजुरीसाठी नोव्हेंबरमध्ये सादर केला होता.