Tue, Sep 17, 2019 22:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'साध्वींना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही'

'साध्वींना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही'

Published On: Apr 24 2019 4:45PM | Last Updated: Apr 24 2019 4:47PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना राष्‍ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालाने दिलासा दिला आहे. साध्वींना निवडणूक लढण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी करणारी याचिका  न्यायालयाने फेटाळली. या प्रकरणाचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी राहिलेल्या साध्वींना भाजपने  भोपाळमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. त्‍यांच्या उमेदवारीवरून वाद सुरू असतानाच मालेगाव स्फोटात मरण पावलेल्या सैय्यद अहमन यांचे वडील बिलाल निसार यांनी कोर्टात धाव घेतली. साध्वींना निवडणूक लढविण्यास परवानगी देऊ नये व त्यांचा जामीन रद्द करावा आणि जास्‍तीत जास्‍त कडक शिक्षा करावी, अशी मागणी बिलाल निसार यांच्या वतीने कोर्टात करण्यात आली. 

बिलाल निसार यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, ‘‘प्रकृती ठिक नसल्‍याचे कारण देत साध्वी कोर्टाच्या कामकाजात सहभागी होत नाहीत. परंतु, त्‍या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्‍या आहेत. त्‍यावरुन त्‍यांची प्रकृती बिघडल्याचे वाटत नाही.’’  दरम्‍यान, प्रकृती ठिक नसल्‍यानेच साध्वी यांना कोर्टाने जामीन दिला होता. 

यावर सुनावणी करताना कोर्टाने सांगितले की, ‘‘देशातील कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढण्यापासून रोखता येत नाही. तसेच आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. त्यामुळे आरोपी नंबर १ ला (साध्वी प्रज्ञासिंह ) निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही.’’ निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा असे कोर्टाने सांगितले.  कोर्टाच्या या निर्णयामुळे साध्वी प्रज्ञासिंह यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिल्‍यापासून त्‍यांची उमेदवारी वादात सापडली आहे. अयोध्या प्रकरणी वादग्रस्‍त वक्‍तव्य केल्‍यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त विधान प्रकरणी निवडणूक आयोगाने त्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.