Thu, Jul 18, 2019 14:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राहुल गांधींवर दोषारोप सिद्ध करण्यासाठी तारीख पे तारीख

राहुल गांधींवर दोषारोप सिद्ध करण्यासाठी तारीख पे तारीख

Published On: Apr 24 2018 2:03AM | Last Updated: Apr 24 2018 12:35AMभिवंडी : वार्ताहर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या दाव्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी सोमवारी (दि.23 एप्रिल) भिवंडी न्यायालयात गैरहजर होते. त्यांच्यावतीने त्यांचे वकील नारायण अय्यर उपस्थित होते. त्यांनी राहुल हे पक्षाच्या कामात व्यस्त असल्यामुळे सुनावणीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचा विनंतीअर्ज दिवाणी न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात सादर केला. त्यामुळे न्यायाधीश शेख यांनी विनंती अर्ज मान्य करून राहुल यांच्यावर दोषारोप सिद्ध करण्याची पुढील सुनावणी 2 मे 2018 रोजी होणार असल्याचे  सांगितले. 

महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसनेच घडवून आणली असे खळबळजनक वक्तव्य राहुल गांधी यांनी 6 मार्च 2014 रोजी पंधराव्या लोकसभा निवडणुकीच्या भिवंडीतील सोनाळे येथील जाहीर प्रचारसभेत केले होते. या वक्तव्याने आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत न्यायालयाकडून आरोप निश्चितीसाठी राहुल गांधी यापूर्वी भिवंडी न्यायालयात 30 जानेवारी 2017 रोजी हजर झाले होते. त्यावेळी न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केवळ वृत्तपत्राच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी बाजू मांडली होती. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करावीत, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. 

दरम्यान, सोमवारी  राहुल यांच्यावर दोषारोप सिद्ध करण्यासाठी सुनावणी होती. त्यांच्या वकिलांनी समरी ट्रायल किंवा समन्स ट्रायल बेसवर सुनावणी संदर्भात वादी, प्रतीवादी वकिलांनी न्यायाधीशांसमोर बाजू मांडली. यावर सुनावणी होवून हा दावा समरी ट्रायलप्रमाणे चालवावा की, समन्स ट्रायल दाव्याप्रमाणे हे 2 मे 2018 रोजी ठरवले जाणार आहे. 

Tags : next hearing, to prove, charge against, Rahul Gandhi,