Mon, Apr 22, 2019 15:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ..तर काँगेस-राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही : चंद्रकांत पाटील

..तर काँगेस-राष्ट्रवादी औषधालाही उरणार नाही : चंद्रकांत पाटील

Published On: Jun 30 2018 5:02PM | Last Updated: Jun 30 2018 5:01PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या दोन पोटनिवडणुका,  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे निकाल पाहता भाजप-शिवसेनेला वेगळं लढून सुद्धा चांगलं यश मिळाल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादी राज्यात औषधालाही उरणार नाही, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. या दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज केल्यास काँग्रेस - राष्ट्रवादी त्याच्या जवळपासही पोहचू शकली नाही. विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला तीन, शिवसेनेला दोन जागा जिंकता आल्या. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात भाजपला एक, शिवसेनेला दोन जागांवर विजय मिळाला. या निवडणुकीत भाजप - शिवसेना हे दोन पक्ष वेगळे लढले, तर काँग्रेस - राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्ष आघाडी करून लढले. मात्र त्यांना फारस यश मिळालं नाही. याचा विचार करता यापुढील निवडणुकांत आम्ही एकत्र लढलो तर त्याचा मोठा फटका काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला बसेल, असे चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आगामी निवडणुका या भाजप - शिवसेनेने एकत्र येऊन लढवाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संबंधित नेत्यांशी चर्चा करण्याची भाजपची तयारी असून शेवटच्या क्षणापर्यंत युतीसाठी प्रयत्न केला जाईल. एवढं करूनही शिवसेना जर वेगळं लढणार असेल तर भाजपची देखील स्वतंत्र लढण्याची तयारी आहे, असे पाटील यांनी सांगितले.