होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नकोशीची केली नखाने गळा चिरून हत्या

नकोशीची केली नखाने गळा चिरून हत्या

Published On: Apr 22 2018 8:38PM | Last Updated: Apr 22 2018 8:38PMडोंबिवली : वार्ताहर

दोन अपत्यानंतर जन्माला आलेली मुलगी नकोशी झाल्याने ६ दिवसांच्या नवजात अर्भकाची नखाने गळा चिरून हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी खुनी आईला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण पश्चिमेकडे असलेल्या उंबर्डे गाव परिसरात राहणारी वैशाली श्रीमंत प्रधान हिला एका मुलगा आणि एका मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. त्यानंतर पुन्हा गरोदर राहिलेल्या वैशालीने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात अठराविश्व दारिद्र्य असलेल्या वैशालीला मोठी चिंता सतावू लागली. घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात मद्यपी पती यामुळे जन्माला तिसऱ्या आपत्याचा खर्च पेलवणे आपल्याला शक्य होणार नाही, असा वैशालीने विचार केला. म्हणून वैशालीने सहा दिवसांच्या आपल्या अपत्याच्या गळ्यावर नखाने वार केले. यात त्या बालिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर ही हत्या लपविण्याच्या उद्देशाने वैशाली त्या बाळाला घेऊन ठाण्याच्या सिव्हील रूग्णालयात घेऊन गेली. 

बालिका मृतावस्थेत असल्याने त्यावेळी तेथे असलेल्या डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तात्काळ वैशालीला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसोशीने चौकशी केली असता आपण मुलीची हत्या केल्याची वैशालीने कबूली दिली. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा खूनी वैशालीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सोमवारी तिला कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. मात्र आजही मुलींच्या बाबतीत असलेली नकोशीची मानसिकता बदलेली नसल्याचे दाहक वास्तव या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे.

Tags : nakusha, nakushi, girl murder, dombawali