होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिठागरांच्या जमिनींचे नव्याने सर्वेेक्षण 

मिठागरांच्या जमिनींचे नव्याने सर्वेेक्षण 

Published On: Apr 11 2018 1:49AM | Last Updated: Apr 11 2018 1:45AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) 2016 च्या आपल्या अहवालात मिठागरांच्या जमिनीमुळे मुंबईचे पुरापासून संरक्षण होत आहे, असे म्हटले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करून एमएमआरडीएनेच या जमिनींचा विकास करण्यासंदर्भात नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे.

मुंबईमध्ये मुलुंड, भांडुप, ट्रॉम्बे, वडाळा, मानखुर्द-चेंबूर, दहिसर व गोरेगाव याठिकाणी मिठागरांच्या जमिनी आहेत. एमएमआरडीएच्या 2016-36 च्या प्रादेशिक आराखडा मसुद्यात म्हटले आहे की, मिठागरे ही केवळ दैनंदिन जीवनमान, अर्थव्यवस्था व मीठ उत्पादनांसाठीच महत्त्वाची नसून किनारपट्टीचे पुरापासून संरक्षण करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र या मिठागरांना सध्या बांधकाम लॉबीचा मोठा धोका निर्माण झाल्याने सर्व ठिकाणच्या जमिनींमध्ये तसेच मीठ उत्पादनात काही प्रमाणात घट निर्माण झाली आहे.

एमएमआरडीएचा मसुदा अहवाल सध्या राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. मालकीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दशकांपासून अडकून पडलेले असताना केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील सरकारने मिठागरांच्या या जमिनी विकासासाठी खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर एमएमआरडीएने या प्रकल्पासंदर्भातील बृहद आराखडा तयार करण्याबाबत राज्य सरकारने ठराव संमत केला. मुंबईतील 25 एकर म्हणजेच 5379 एकरपैकी 0.5 टक्के जमिनीचा विकास करु शकतो, असे 2016 साली करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण व वन खात्याने ओलसर जागांमधून मिठागरांना वगळण्यासंदर्भातील ओलसर जमीन कायदा 2017 मध्ये सुधारणा केल्यानंतर आता मिठागरांच्या जमिनीचे नव्याने सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.

Tags : mumbai, mumbai news, saltpan,  new survey, land,