Sun, May 19, 2019 14:49
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अधिक्षक अभियंत्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक निलंबित

अधिक्षक अभियंत्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक निलंबित

Published On: Jan 06 2018 1:25AM | Last Updated: Jan 06 2018 12:51AM

बुकमार्क करा
नवी मुंबई : राजेंद्र पाटील

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने शुक्रवारी दुपारी बाजारपेठेतील बांधकाम विभागांतर्गत येणार्‍या कामांकडे दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्याचा ठेपका ठेवत थेट अधिक्षक अभियंत्यासह वरिष्ठ स्वच्छता निरिक्षकावर निलंबनाची कारवाई केली. यात अभियंता विभागाचे प्रमुख व्ही.बी.बिरादार व वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक किरण घोलप यांचा समावेश आहे. या कारवाईने अभियंता विभागातील हिटलिस्टवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.  एपीएमसी प्रशासक सतीश सोनी व सचिव शिवाजी पहिनकर यांनी यास दुजारा देत कारवाईचा बडगा उगारल्याचे पुढारीशी बोलताना सांगितले.

एपीएमसीच्या पाचही बाजारपेठांमध्ये सोयीसुविधा नसल्याच्या तक्रारी माथाडी कामगार, नेते व व्यापार्‍यांनी अनेकदा प्रशासनाकडे केल्या होत्या. मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारा अभियंता विभाग शुक्रवारी अखेर प्रशासनाच्या कचाट्यात सापडला. पाच वर्षात केवळ 22 कामे मार्गी लागली आहेत. अनेकदा लेखी सूचना, मेमो देण्यात आले. मात्र त्याचे उत्तरही अभियंता विभागाचे प्रमुख व्ही.बी.बिरादार यांच्याकडून आले नसल्याचे सचिव शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. या विभागात एकूण 15 अधिकारी आहेत. त्यात एक अधिक्षक अभियंता, दोन कार्यकारी अभियंता, सहा उपअभियंता, पाच कनिष्ठ अभियंता आणि एक विद्युत अभियंता यांचा समावेश आहे. हे अधिकारी मार्केट कार्यालयात असतात पण प्रत्यक्षविभागात कधीच फिरत नाहीत. मार्केटमध्ये होत असलेले व आतापर्यंत झालेले अनधिकृत बांधकाम, व्यापार्‍यांनी वाढवलेले ओटे, गाळ्यांतर्गत बांधकामातील बदल, रस्ते, नाले, गेट, संरक्षक भिंत अशा एक नाही तर अनेक कामांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या विभागाचे प्रमुख अधिक्षक अभियंता व्ही.बी.बिरादार यांच्यावर ठेवल्याचे सचिव पहिनकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे पाच लाख रुपयांपेक्षा अधिकच्या कामांना न्यायालयाने स्थागिती दिली आहे. मात्र पाच लाखांपेक्षा कमी खर्चाची कामे करण्यास कुठलीच हरकत नाही. ई टेंडर काढून कामे होऊ शकली असती. मात्र ती केली गेली नाहीत. यामुळे गुरुवारी प्रशासकांच्या कार्यालयात आंदोलन केले गेले. 
फळबाजारात हलगर्जीपणा व व्यापार्‍यांच्या वाढत्या तक्रारींमुळे वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक किरण घोलप यांची बदली करण्यात आली होती. मात्र कामात कुठलीच सुधारणा न करता नको ते उपद्व्याप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एकही प्रसाधनगृह स्वच्छ नसल्याने व्यापारी लघुशंकेसाठी शौचालयात जात नव्हते. सर्वत्र अस्वच्छतेचे आगार निर्माण झाल्याने स्वच्छता विभागालाही यावेळी इशारा देण्यात आला. सतीश सोनी यांनी प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर सचिव आणि अधिकार्‍यांसह बाजारपेठेचा दौरा केला. यात अनेक सुचना केल्या होत्या. मात्र आपले कुणी वाकडे करु शकणार नाही, अशा भ्रमात असलेल्या अधिकार्‍यांना एपीएमसी प्रशासनाने दणका दिला.