Tue, May 21, 2019 13:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाशी खाडीच्या तिसर्‍या पुलासाठी ८०० कोटी

वाशी खाडीच्या तिसर्‍या पुलासाठी ८०० कोटी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलावर तिसरा पूल बांधण्यास नुकतीच सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली. हा नवीन पूल बांधण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये खर्च येणार असून त्यासाठी सिडको, एमएसआरडीसीची मदत सरकार घेणार असल्याची माहिती आ. मंदा म्हात्रे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

या नवीन पुलासाठी राज्य सरकार चारशे कोटी रुपये कर्ज घेणार असून सिडको दोनशे कोटी आणि एमएसआरडीसी दोनशे कोटी रुपये राज्य सरकारला देणार असल्याचे आ. म्हात्रे म्हणाल्या. लवकरच या पुलाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्याबाबत अंतिम स्वरूप येणार आहे. 

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा पहिला पूल  वाशी खाडीवर 1970 ते 75 साली उभारण्यात आला. त्यानंतर बांधकाम विभागाने 1990 ते 95 दरम्यान दुसरा पूल याच खाडीवर बांधला. मुंबईतून कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात जाणार्‍या सर्व वाहनांसाठी हाच मार्ग असल्याने या मार्गावरुन बांधकाम विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार रोज सरासरी 12,500 एवढ्या संख्येने वाहनांची ये-जा होते. 

वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक कोंडी होत होती. नवीन पूल व्हावा यासाठी आ. मंदा म्हात्रे यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.  

सध्या प्राथमिक स्तरावर या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. ऑक्टोबर 2015मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या पुलाच्या बांधणीबाबत सकारत्मक चर्चा झाली होती. मात्र त्यानंतर या पुलाबाबत कुठलाच निर्णय किंवा प्रस्ताव तयार करण्यात आला नव्हता.  पुन्हा आमदारांनी तगादा लावल्याने हा पुल चर्ची आला आणि 2016 पासून कार्यवाही सुरू करण्यात आली होती.