Sat, Nov 17, 2018 12:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीला बसवा

Published On: Feb 17 2018 10:50AM | Last Updated: Feb 17 2018 10:50AMमुंबई : प्रतिनिधी 

शे पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. हप्ते न फेडल्याने त्याच्यावर जप्तीचा कारवाई केली जाते. मात्र देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला असून प्रसिद्धी आणि जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च केला जात आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला लगावला आहे.

काय आहे अग्रलेखात ….

 नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही! पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत.