Sun, Sep 22, 2019 22:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्झिट पोलनंतर शरद पवार 'ॲक्टीव्ह'; सुरू केल्या भेटीगाठी अन् फोनाफोनी!

एक्झिट पोलनंतर शरद पवार 'ॲक्टीव्ह'; सुरू केल्या भेटीगाठी अन् फोनाफोनी!

Published On: May 20 2019 12:25PM | Last Updated: May 20 2019 12:25PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सर्वच एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळणार असल्याचे भाकित केल्याने विरोधकांमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. त्यामुळे दिल्लीत आता नव्याने खलबते सुरू झाली आहेत. एक्झिट पोलची मागील पार्श्वभूमी लक्षात घेऊन विरोधकांनी एक्झिट पोल फेटाळून लावले आहेत. अंतिम चित्र २३ मे रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. 

अधिक वाचा : उत्तर प्रदेशात नेमकी हवा कुणाची? सगळ्याच एक्झिट पोलची अव्वाच्या सव्वा आकडेवारी! 

एकीकडे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांची सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. नायडू आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही विरोधकांची मोट बांधण्यासाठी सक्रीय झाले आहेत. काँग्रेसनेही संभाव्य रणनीती कशा पद्धतीने आखता येईल चर्चा सुरू केली आहे. 

एक्झिट पोलमधील भाकित पलटल्यास युपीए किंवा तिसऱ्या मोर्चाच्या चाचपणीवरही भर दिला जात आहे. पवारांनी प्रादेशिक नेत्यांना गळ टाकण्यास प्रारंभ केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून संभाव्य परिस्थितीवर काय करता येईल याचा अंदाज घेत आहेत. 

अधिक वाचा : फिर एक बार मोदी सरकारचे संकेत, पण एकुण मतदानाचा टक्का घसरला ! 

दरम्यान, भाजपला कदाचित बहुमतासाठी काही जागांची गरज भासल्यास तेलंगणामधून के. चंद्रशेखर राव, ओडिशामधून नवीन पटनायक, आंध्रमधून जगनमोहन रेड्डी यांची मदत मिळू शकते. त्यामुळे पवारांनी नवीन पटनायक यांच्याशी संपर्क साधला आहे. विशेष म्हणजे भाजपने नवीन पटनायक यांच्यावर तेवढा प्रहार केला नाही जितका इतर प्रादेशिक नेत्यांवर केला आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. 

दुसरीकडे सर्वांधिक ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशात एक्झिट पोल गडबडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एक्झिट पोलची अव्वाच्या सव्वा आकडेवारी पाहून सगळेच बुचकळ्यात पडल्याने नेमकी हवा कुणाची अशी चर्चा रंगली आहे. अशा स्थितीमध्ये भाजप २०१४ ची ऐतिहासिक पुनरावृत्ती करणार की महाआघाडी किंग होणार याची उत्सुकता आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव मायावतींच्या भेटीला पोहोचले आहेत.      

उत्तर प्रदेशात काही एक्झिट पोलनी भाजप २०१४ ची पुनरावृत्ती करेल असे भाकित केले आहे, तर काहींनी भाजपचा सुफडा साफ होईल अशीही शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे मायावती आणि अखिलेश यांची महाआघाडी भाजपचा धुव्वा उडवेल अशीही आकडेवारी काही एक्झिट पोलनी दिली आहे, तर काहींनी महाआघाडीचे पारडे जड असल्याचे भाकित केले आहे.