Sat, Mar 28, 2020 17:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'भीमा कोरेगाव प्रकरणी समांतर चौकशी करून सत्य बाहेर आणा'

'भीमा कोरेगाव प्रकरणी समांतर चौकशी करून सत्य बाहेर आणा'

Last Updated: Feb 18 2020 1:01PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी समांतर चौकशी करण्याचा राज्य सरकारला अधिकार असून  या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून सत्य बाहेर आणा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली.

वाचा : इंदोरीकर महाराज अखेर नमले, व्यक्त केली दिलगिरी

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारला करू देणार नसल्याचे वक्तव्य केले होते, त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

पवार यांनी यावेळी भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांवर संशय व्यक्त केला. ते म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलाचा आपल्याला अभिमान आहे. परंतु कोरेगाव प्रकरणी तपास करणार्‍या काही पोलिसांच्या तपासावर आपला आक्षेप आहे. कोरेगाव येथे अभिवादनासाठी दरवर्षी हजारो लोक जमतात. तेथे स्थानिक विरुद्ध बाहेरून येणाऱ्या लोकांमध्ये कधी संघर्ष झाला नव्हता. मात्र  संभाजी भिडे यांनी गावात वेगळे वातावरण निर्माण केले, असा आरोप पवार यांनी  केला.

 एल्गार परिषद आणि  कोरेगाव भीमा प्रकरणाचा संबंध नाही. पण ज्याचा या दोन्ही घटनांशी संबंध आला नाही,  अशांनाही पोलिसांनी अटक केली. सत्य- असत्य न तपासता एल्गारबाबत केंद्राने तत्परता का दाखवली, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

वाचा : 'सामना'तील नाणार जाहिरातीबाबत मुख्यमंत्र्यांचा खुलासा, म्हणाले...

 एसआयटीमार्फत तपास झाल्यास तुरुंगात डांबलेल्याबाबत सत्य बाहेर येईल, असा दावाही त्यांनी केला.

एल्गार परिषदेमध्ये १०० पेक्षा जास्त संघटना सहभागी झाल्या होत्या. पण या परिषदेमध्ये सहभागी नसलेल्यावरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले.  सुधीर ढवळे त्यांनी नामदेव ढसाळ यांच्या कविता वाचल्या होता. एक प्रकारे लोकांचा तीव्र भावना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिस आणि मागच्या सरकारने अधिकाराचा गैरवापर करून परिषदेशी हजर नसलेल्या लोकांनाही या गुन्ह्यात गोवले. लोकांचा तीव्र भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. काही पोलिस एल्गारच्या तपासाबाबत सहमत नाहीत. राज्य सरकारला समांतर चौकशी करता येते. पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे स्पष्ट दिसत असल्यामुळे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. कारण पोलिसांचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन संशयित होता. एसआयटीमार्फत तपास करून सत्यता बाहेर आणली पाहिजे, असा पुनरुच्चार पवार यांनी केला.