मुंबई : प्रतिनिधी
आगामी काही दिवसांत केंद्र सरकार उलथून टाकण्याचा नक्षलवाद्यांचा कट होता. त्यासाठी भाजपप्रणीत राज्यांत घातपात घडविण्याची नक्षलवाद्यांची योजना होती. इतकेच नव्हे, तर एल्गार परिषदेसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी आला होता, असे तपासात उघडकीस आले आहे, अशी धक्कादायक माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कवी वरावरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नन गोन्सालवीस यांच्यावर पुणे पोलिसांनी केलेली कारवाई योग्य असून, त्यांच्या चौकशीसाठी आता आपण प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंतच्या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्यात काही संगणक आणि लॅपटॉप आदींचा समावेश असून, या सर्वांचे पासवर्ड मिळाले आहेत. या कागदपत्रांवर मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, असेही तपासात निष्पन्न झाल्याचे परमवीर सिंग यांनी सांगितले.
आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष नक्षलवाद्यांशी संबंध होते. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत. त्यातून नक्षलवाद्यांना विविध मार्गांनी पैसा पुरविल्याचे उघड झाले आहे. तसेच या पत्रात काही विदेशी हत्यारांचा उल्लेख आणि फोटोग्राफ पोलिसांना सापडले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेत सुधा भारद्वाज आणि मिलिंद तेलतुंबडेच्या पत्रांमधील आक्षेपार्ह आणि मजकुराची माहिती देण्यात आली. मिलिंद तेलतुंबडे यांच्या पत्रात सरकारविरोधात मोठ्या कारवाईचा उल्लेख करताना जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे नमूद करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अनेक उपाययोजनांचा उल्लेख करताना जंगलातील कॉम्रेडपर्यंत ही योजना पोहोचण्याची जबाबदारी कॉम्रेड सुरेंद्र गडलिंग यांच्यावर सोपविण्याचा उल्लेख होता. या कामगिरीसाठी कॉम्रेड वरावरा राव यांनी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविल्याचे नमूद करण्यात आले होते. वरावरा राव यांच्या सांगण्यावरून अलीकडेच ऐंशीहून अधिक गाड्या जाळण्यात आल्या होत्या. त्याचा पत्रात उल्लेख आहे. सुधा भारद्वाज यांच्या पत्रातही अशाप्रकारे आक्षेपार्ह मजकुरांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रोफेसर साईबाबाला शिक्षा होताच, संघटनेच्या शहरी भागात काम करणार्यांमध्ये काही प्रमाणात दहशत निर्माण झाली असून, त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकामी काश्मीरमधील फुटीरवाद्यांकडून काही दहशतवादी संघटना, त्यांच्या नातेवाईकांना काही पॅकेज निश्चित केले पाहिजे. त्यामुळे ते त्यांच्यासाठी समर्पण भावनेने काम करतील, असा मजकुरात उल्लेख आहे. या गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपी मिलिंदने ते पत्र महाराष्ट्र झोनल कमिटीला लिहिले आहे.
जेएनयूच्या विद्यार्थ्यांना जंगलात भूमिगत करण्यासाठी पाठविले जात होते. त्यांना ट्रेनिंगसाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविला जात होता. केंद्र सरकारविरुद्ध या नक्षलवाद्यांना एकप्रकारे युद्ध पुकारल्याचे या पत्रावरून उघडकीस आले आहे. त्यात संबंधित पाचही विचारवंत, लेखक अशाप्रकारे त्यांना मदत करीत होते, हे कागदपत्रांवरून सिद्ध होते, असेही सिंग यांनी सांगितले.
याच आरोपींकडून जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांना नक्षलवाद्यांकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू होते. याच पत्रात चार लाख राऊंड, ग्रेनेड आणि आठ कोटी रुपयांचा समावेश होता. एल्गार परिषदेसाठी सुरुवातीला पाच लाख रुपये आणि नंतर दहा लाख रुपये पाठविण्यात आले होते. ही रक्कम कॅश स्वरूपात देण्यात आली होती. या परिषदेसाठी चार ते साडेचार लाख लोकांनी सहभाग घेतला. मात्र, आमचा सर्वांवर संशय नसून, ज्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले, त्याच्यावर ही कारवाई केल्याचे सिंग यांनी सांगितले.
यावेळी परमवीर सिंग यांनी मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांच्यातील पत्रातील संबंधाचे पुरावे पत्रकारांसमोरच वाचून दाखविले. वरावरा राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वर्नन गोन्सालवीस यांच्या घरावर केलेल्या कारवाईचे तसेच जप्त कागदपत्रांचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले आहे. पंचनामा कागदत्रांवर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली होती. असेही परमवीर सिंग यांनी सांगितले.
विदेशी माओवादी संघटनेशी संपर्क
जप्त कागदपत्रांनुसार अटक आरोपी काही विदेशी माओवादी संघटनेच्या संपर्कात होते, त्यांच्यातील बैठकांमध्ये अशा संघटनांशी संबंध जोडण्यावर अधिक भर होता. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये महत्त्वाची ठरलेल्या एल्गार परिषद यशस्वी झाल्याचा एका पत्रात उल्लेख होता. तसेच या पत्रात भाजपप्रणित राज्य आणि आरएसएसचे प्रभाव असलेल्या राज्यात आणखीन आंदोलन उग्र करण्यावर भर देण्याचा उल्लेख होता. भाजपच्या ब्राह्मणी कामाविरोधात दलितांचे आंदोलन उभे करुन त्यांना राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा होता. त्यामुळे वरावर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांची पोलिसांना कोठडी हवी आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची चौकशीची गरज असल्याचेही परमवीर सिंग यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहे. याबाबत न्यायालयात पुरावे सादर करुन त्यांच्या कोठडीची मागणी केली जाईल असे त्यांनी सांगितले.