Mon, Jul 22, 2019 01:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा : रावल

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा : रावल

Published On: Jan 30 2018 3:22PM | Last Updated: Jan 30 2018 3:22PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अधिसूचित झालेल्या जमीन खरेदीवरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मलिक यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. धर्मा पाटील यांच्या अंत्यविधीसाठी रावल धुळ्यातील विखरण या गावात गेले होते. पाटील यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार झाल्‍यानंतर त्‍यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

रावल म्‍हणाले, ‘‘नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन आपल्यावर आरोप केले असून, त्यांच्यावर दोंडाईचा पोलिस ठाण्यात आणि कोर्टात मानहानीचा दावा दाखल करणार आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आमच्याकडे पाच हजार एकर जमीन होती. विविध प्रकल्पांसाठी माझ्या आजोबांनी ही जमीन दिली. माझ्या कुटुंबाने शेकडो एकर जमीन दिली असताना, आम्‍ही शेतकऱ्यांच्या बाबतीत असले राजकारण करणार नाही.’’ 

दरम्‍यान, आपल्‍याकडे रावळ यांनी केलेल्‍या घोटाळ्याचे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी न्यायालयात सादर करणार असल्‍याचे मलिक यांनी म्हटले आहे. 

संपादित जमिनीसाठी योग्य मोबदला न मिळाल्याच्या कारणावरून धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी रोजी मंत्रालयात विष प्राशन केले होते. त्यांनंतर जे.जे. रुग्‍णालयात त्‍यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांचा २८ जानेवारी रोजी रात्री त्‍यांचा मृत्यू झाला. त्‍यांच्या मृत्‍यूला सध्या राज्‍यात असलेल्‍या भाजप सरकारला जबाबदार धरत भाजपवर सर्वच स्‍थरातून टीकेची झोड सुरु आहे. नवाब मलिक यांनीही यावरून मंत्री रावल यांच्यावर टीका केली होती. 

‘‘जयकुमार रावल आणि कंपनीचा धुळे जिल्‍ह्‍यात जमीन खरेदी आणि विक्रीचा धंदा आहे.  एखादा प्रकल्प जाहीर झाला की, शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने जमीन विकत घेतात. शिवाय धर्मा पाटील यांची  मंत्रालयातील जमीन बैठक जयकुमार रावल यांनीच ऊर्जामंत्री बावनकुळे यांना सांगून रद्द केली होती. त्यामुळे निराश होऊन धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. प्रकल्प ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणची जमीन खरेदी करून वाढीव मोबदला सरकारकडून  घेण्याचा प्रकार रावल करतात.’’ असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.