Tue, Jul 23, 2019 06:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठीद्वेष्टे सोमय्या मराठी नाट्यसंमेलनाचे उपाध्यक्ष कसे?

मराठीद्वेष्टे सोमय्या मराठी नाट्यसंमेलनाचे उपाध्यक्ष कसे?

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 1:55AMमुंबई : प्रतिनिधी

98 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे 14 जून पासून भरणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. हे ठीक आहे. पण भाजपाचे मराठीद्वेष्टे खासदार किरीट सोमय्या हे नाट्यसंमेलनाचे उपाध्यक्ष आहेत.महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी हा विषय सक्तीचा केला तेव्हा मराठी विरोधात न्यायालयात धाव घेणारे किरीट सोमय्या हेच आहेत, याकडे माजी आमदार व ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनी आता लक्ष वेधत नाट्यसंंमेलनाच्या आधीच वादग्रस्त नाटकांची तिसरी घंटा वाजवली आहे. 

मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सकाळी 6 ते 9 या वेळेत जॉगर्सना परंपरागत ज्यूस पुरवणार्‍या मराठी विक्रेत्याला मैदानाच्या सीमेवरून रस्त्यावर हाकलणारे हेच सोमय्या महाशय  मुलुंड रेल्वे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आक्रमण करणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांबाबत मूग गिळून गप्प बसले याकडे लक्ष वेधून शिशिर शिंदे म्हणतात, 1985 पासून नगरसेवक आणि विधानसभेत हॅट्ट्रिक करणारे मुलुंडचे पेव्हरसम्राट आमदार सरदार तारासिंह नाट्यसंमेलनाचे सचिव आहेत. सरदार तारासिंह कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फक्त हिंदीतच बोलतात. तारासिंह यांनी तिकीट काढून एकतरी मराठी नाटक आजपर्यंत पाहिले आहे काय?, असा सवालही शिंदे यांनी केला.

सोमय्या व तारासिंह एखाद्या मराठी रंगकर्मीच्या मदतीला कधी धावून गेल्याचे एकही उदाहरण सापडत नाही. सुप्रसिध्द अभिनेते विजय चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला. मुलुंडकर विजय चव्हाणांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करण्याचे सौजन्यसुध्दा सोमय्या व तारासिंह या जोडगोळीने दाखवले नाही.सर्वात कहर म्हणजे स्थानिक नगरसेविका श्रीमती समिता कांबळे यांचे  नाव कुठेच नाही(सुज्ञास अधिक सांगणे न लगे). मराठी नाट्यसंमेलनाच्या आवाहन पत्रिकेत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे नाव या निरर्थक राजकारण्यांनंतर 6 व्या स्थानावर आहे.

थोडक्यात साहित्य संमेलन असो किंवा नाट्यसंमेलन असो येथे पंचपक्वान्नांच्या किती पंगती ऊठल्या याचाच हिशोब सवंग लोकप्रियतेसाठी केला जातो.उत्सवी संमेलनांमधून चांगले साहित्य,विचार मंथन किंवा मराठी नाट्यसृष्टीपुढील आव्हाने असे विषय केव्हाच हद्दपार झाले.हीच मराठीची शोकांतिका आहे, असल्याचे शिशिर शिंदे म्हणतात.