Tue, Jul 07, 2020 21:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्झिट पोल आणि गुहेतील ध्यान ही नौटंकी : शरद पवार

एक्झिट पोल आणि गुहेतील ध्यान ही नौटंकी : शरद पवार

Published On: May 21 2019 8:31AM | Last Updated: May 21 2019 8:35AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जवळच्याच एका गुहेत जाऊन ध्यानही केले. यावरुन विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दर्शनाला 'नौटंकी' असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केदारनाथ मंदिरात जाणे आणि एक्झिट पोल हे दोन्ही नौटंकी आहे अशीही टीका शरद पवार यांनी केली आहे. आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. निवडणूक झाल्यावर देशातले सत्ताधारी हिमालयात जाऊन बसले आहेत अशी बोचरी टीकादेखील पवारांनी मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मोदींवर केली. 

तसेच मोदींसह माध्यमांवरदेखील निशाणा साधला आहे. काही माध्यमे सत्ताधारी पक्षाच्या बाहुल्या बनल्या असल्याची टीका पवारांनी माध्यमांवर केली आहे. मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे. पण काळजी करण्याची गरज नाही. काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल. असेही पवार यांनी सांगितले. सौहार्दासाठी आपण दुवा मागणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

आम्ही इथे बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटले आहे.