Thu, Apr 25, 2019 07:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधासाठी तीन पक्ष एकत्र आले हाच विजय : राणे

विरोधासाठी तीन पक्ष एकत्र आले हाच विजय : राणे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाही. माझ्या उमेदवारीला शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्‍नच येत नाही. मला पराभूत करण्यासाठी तीन पक्षांना एकत्र यावे लागते हाच माझा विजय आहे. आगामी काळात काय चमत्कार होतो ते पाहा, मी आमदार होणारच, असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला.

काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या नावाने स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतला होता. त्यामुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत राणे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांना भाजपाने उमेदवारी दिली. 

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राणे यांनी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काल रात्री आपली भेट झाली. त्यांनी मांडलेली भूमिका मला पटल्याने व त्यांच्यावर विश्‍वास असल्यानेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा विरोध असता तरी १०० टक्के निवडून आलो असतो, असा दावा त्यांनी केला.