Sun, Jul 21, 2019 05:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारायण राणे राज्यसभेसाठी निश्‍चित

नारायण राणे राज्यसभेसाठी निश्‍चित

Published On: Mar 10 2018 8:24PM | Last Updated: Mar 10 2018 8:24PMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील राज्यसभेत जाणार, हे निश्‍चित झाले आहे. राज्यसभेची भाजपने दिलेली ऑफर नारायण राणे यांनी स्वीकारली असून ते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही दिल्लीत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, एकनाथ खडसे ही ऑफर स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता आहे. भाजपकडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

16 राज्यांतील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. भाजपकडून महाराष्ट्रातून तीन जणांना राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर गेलेले प्रकाश जावडेकर यांनी यावेळी महाराष्ट्रातून उमेदवारी अर्ज भरला आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आाहे. राज्य मंत्रिमंडळात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे. राणे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेचा विरोध आहे. राणेंना मंत्रिमंडळात घेतले, तर सरकारमधून बाहेर पडण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला. त्यामुळे राणेंचे राजकीय भवितव्य अधांतरी बनले होते. शेवटी त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली. आ. नितेश राणे यांनी ट्विटरवर राणेंकडून ही ऑफर नाकारण्याचे संकेत दिले होते. मात्र, भाजपश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राणेंनी ही ऑफर स्वीकारली. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती झाली नाही, तर राणेंना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरविण्याची भाजपची रणनीती असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.

भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी वादात सापडलेल्या एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले आहे. त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली असली, तरी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने खडसे यांचेही राजकीय भवितव्य अंधारात आहे. स्वत: खडसे मंत्रिमंडळात पुनरागमन होणे कठीण दिसत असल्याने अस्वस्थ आहेत. त्यातून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनाही भाजपश्रेष्ठींनी राज्यसभेची ऑफर दिली आहे. मात्र, एकनाथ खडसे ती स्वीकारतात की नाही, याबाबत अजूनही साशंकता कायम आहे. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न पक्षाकडून सुरू असल्याचे समजते.

काँग्रेसचा तिढा कायम
राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा खा. वंदना चव्हाण यांना संधी दिली असून, शिवसेनेनेही खा. अनिल देसाई यांनाच राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत मात्र अजूनही उत्सुकता कायम आहे. खा. राजीव शुक्ला हे गेल्यावेळीही महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर गेले होते. यावेळीदेखील त्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते रत्नाकर महाजन यांचीही नावे चर्चेत आहेत.