होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'नाणार' चंद्रावर न्या, पण कोकणात होऊ देणार नाही : राज ठाकरे आक्रमक

'नाणार' चंद्रावर न्या, पण कोकणात नको; राज आक्रमक

Published On: Apr 16 2018 2:13AM | Last Updated: Apr 16 2018 9:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

नाणार रिफायनरी हवी तर चंद्रावर न्या, पण काही झाले तरी हा प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही, राज्य सरकारला काय करायचे ते करावे, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. कठुआमध्ये एका चिमुरडीवर बलात्कार झाला असताना भाजप बलात्कार्‍यांना पाठीशी घालत आहे. भाजप हा बलात्कार्‍यांचा पक्ष असून त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवायच्या आहेत, अशी घणाघाती टीकाही राज ठाकरे यांनी केली. 

मनसेच्या वतीने मुलुंड येथे शंभर महिलांना राज ठाकरे यांच्याहस्ते महिलांना चावी वाटप करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर चौफेर टीका केली. नाणार प्रकल्पाबाबत भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही. राज्य सरकारला काय करायचे ते करावे मी हा प्रकल्प होऊ देणार नाही. प्रकल्प झाला नाहीतर तो गुजरातला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. हा प्रकल्प गुजरातलाच कसाकाय जाईल. मुख्यमंत्री अन्य राज्याचे नाव का घेत नाहीत. म्हणजे हा प्रकल्प रद्द झाला की तो गुजरातला घेऊन न्यायचा हे ठरलेले असावे. पण, तुम्ही हा प्रकल्प हवा तर चंद्रावर नेलातरी हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. प्रकल्प होण्याआधीच तेथील जमीनी या राजकारणी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्या आहेत. तेथे दलाल फीरत असून सुमारे अडीच हजार एकर जमीन विकीलीही गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. 

कठुआ बलात्कार घटनेवरुन त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले. एका चिमुरडीवर पाशवी बलात्कार करुन तीचा खून करण्यात आला असताना आरोपींवर कारवाई होऊ नये म्हणून भाजप बलात्कार्‍यांना पाठीशी घालत आहे. राष्ट्रध्वज हातात घेऊन आणि भारत मातेचा जयघोष करुन आरोपींची बाजू घेतली जात आहे. मात्र, बलात्कार्‍यांना धर्म नसतो. तो कोणत्याही जातीचा असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे राज ठाकरे म्हणाले. गेल्या चार वर्षात भाजपकडे सांगण्यासारखे काहीही नसल्याने ते धर्माधर्मात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा हल्लाही त्यांनी चढविला. 

आपण पंतप्रधान झालो ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे असे नरेंद्र मोदी म्हणाले. हे त्यांनी पंतप्रधान होतानाच सांगायला हवे होते. मात्र, आज सर्व अंगाशी येत असल्यामुळेच मोदींनी हे वाक्य उच्चारले आहे. पंतप्रधान होण्याआधी मोदी हे असे आहेत हे मला माहीत नव्हते, अशी टोलेबाजी करतानाच तीस वर्षानंतर स्पष्ट बहुमत मिळूनही मोदी काहीही करु शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली. गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणणार्‍या भाजपने गुजरातच्या निवडणुकीनंतर त्यांना पप्पू म्हणने बंद केले आहे. आता ते परमपूज्य झाले आहेत? असा चिमटा काढला.  तसेच 1 मे पासून आपण राज्यभर दौरे करणार असून त्याची सुरुवात ही पालघर येथून करणार असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. 

उस्मानाबादच्या शेतकर्‍यांनी मंत्रालयात भाजीपाला टाकून केेलेल्या आंदोलनाचा उल्लेख करताना शिवसेनेच्या नगरसेवकाच्या तक्रारीवरुन शेतकर्‍यांवर मुंबई महापालिकेने त्यांना हटवल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. परप्रांतिय फेरीवाले राजरोसपणे धंदा करीत असताना आपल्याच शेतकर्‍यांच्या विरोधात तक्रार होते हे दुर्दैवी आहे. परप्रांतियांविरोधात केवळ मीच बोलत असल्याने त्याची राजकीय किंमतही मला मोजावी लागते. मात्र, महाराष्ट्राच्या हितासाठी मला त्रास झाला तरी चालेल, असे राज ठाकरे म्हणाले.