Tue, Mar 26, 2019 01:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गावाकडला, रांगडा ‘आपला मानूस’

गावाकडला, रांगडा ‘आपला मानूस’

Published On: Jan 19 2018 10:50PM | Last Updated: Jan 19 2018 10:49PMमुंबई : प्रतिनिधी

नाना पाटेकर, इरावती हर्षे, सुमीत राघवन ही तगडी स्टारकास्ट... सतीश राजवाडे सारखा कसलेला दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगण.... असा भारदस्त योग जुळून आलेल्या आपला मानूस या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा गुरुवारी रात्री मुंबईत थाटात संपन्न झाला. जुहू चौपाटीच्या किनार्‍यावर या ट्रेलर लाँचसाठी झालेली गर्दी, चित्रपटाच्या यशाची वर्दी देत आहे, अशी भावना नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. 

आपला मानूस ही सुमीत राघवन आणि इरावती हर्षे हे दाम्पत्य, त्यांच्या घरातील वृद्ध सदस्य, त्यांच्याशी असलेले मतभेद, त्यातून झालेली आत्महत्त्या, तिचा एका पोलिसाने केलेला तपास आणि त्यातील माणुसकीचे कंगोरे, अशी कथा आहे. नाना पाटेकर यांनी या चित्रपटात ग्रामीण भागातूत आलेल्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा पोलीस थोडा विक्षिप्त, तर्‍हेवाईक तरीही आपला वाटणारा आहे. तो गावाकडचा आहे, त्याची भाषा गावाकडची आहे, म्हणून तो ‘आपला मानूस’ असे नाना पाटेकर यांनी ट्रेलर लाँचप्रसंगी बोलताना सांगितले. 

या कार्यक्रमासाठी अजय देवगण उपस्थित राहणार, अशी अपेक्षा होती. पण काही कारणामुळे तो उपस्थित राहू शकला नाही. अजय देवगणच्या अनुपस्थितीत अख्खा ट्रेलर लाँच सोहळा नानामय झाला होता. चित्रपटाच्या पोस्टरवर बुलेटस्वार नाना लक्ष वेधून घेतो. ट्रेलर लाँच सोहळ्यातही नानाची बुलेटवर बसलेली छबी टिपण्यासाठी कॅमेरे लखलखले.

चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान केलेल्या गमतीजमतींना नाना, सुमीत आणि इरावती हर्षे या तिन्ही प्रमुख कलाकारांनी उजाळा दिला. इरावती हर्षे हिच्या इंग्रजीवर नानानी मिश्कील कोटी केली. इरावतीनेही मोजक्या शब्दांत नानांची मिमिक्री करीत परतफेड केली. नानांनी घेतलेली सुमीतची फिरकी हशा आणि टाळ्या घेणारी ठरली. 45 दिवसांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक अवघ्या 41 दिवसांत संपले, गृहपाठ आणि तयारी व्यवस्थित केल्यामुळेच हे जमू शकले, असे सर्वच कलाकारांनी सांगितले. नानांच्या कोपरखळ्यांतून मनवा नाईकचीही सुटका झाली नाही. 

यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, सहनिर्माता अभिनव शुक्ला, व्हाया कॉमचे सीओओ , बिझनेस हेड निखिल साने, सविता मालपेकर उपस्थित होते. मनवा नाईक हिने सूत्रसंचालन केले.