Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किडनीच्या नावाने फसवणूक करणार्‍या जोडप्याला अटक

किडनीच्या नावाने फसवणूक करणार्‍या जोडप्याला अटक

Published On: Jan 19 2018 2:10AM | Last Updated: Jan 19 2018 1:51AMमुंबई : प्रतिनिधी

किडनीच्या नावाने अनेकांची फसवणूक करणार्‍या एका जोडप्याला मालाड पोलिसांनी अटक केली. उच्चशिक्षित असलेल्या लठ्ठ पत्नीच्या औषधोपचारासाठी ही फसवणूक केल्याची कबुली आरोपीनी पोलिसांना दिलेल्या जबानीत दिली आहे. 

विजय बुधरभाई दोदारिया आणि रिया विजय दोदारिया अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही येथील लोकल कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रिया आणि विजय सध्या गुजरातच्या भावनगरमध्ये राहतात. रिया ही लठ्ठ असल्याने तिच्यावर उपचारासाठी बराच खर्च येत होते. त्यातून विजयला एक योजना सुचली आणि त्याने गुगलवर किडनी डोनर करणार्‍या व्यक्तींची माहिती काढण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी एक बोगस वेबसाईट तयार करुन किडनी दिल्यास संबंधित व्यक्तीला 50 लाख रुपये आणि इतर सुविधा मिळतील अशी बतावणी केली होती. या साईटवर त्यांनी मालाडच्या एका खाजगी हॉस्पिटलचे नाव आणि मोबाईल क्रमांक दिला होता. मात्र हा मोबाईल क्रमांक त्यांचाच होता. त्यानंतर किडनी देणार्‍या व्यक्तींना ते सुरुवातीला दहा हजार रुपयांची प्रोसेसिंग फी भरण्यास सांगत होते. ही रक्कम भरल्यानंतर त्यांना एक तारीख दिली जाईल आणि नंतर पुढील प्रोसेसिंग होईल असे सांगण्यात आले. अशा प्रकारे काही महिन्यांत त्यांनी अनेकांकडून पोसेसिंग फीच्या नावाने सात ते आठ लाख रुपये जमा केले. 

त्यांनी पुण्याच्या एका महिलेकडून दहा हजार रुपये घेतले. मात्र नंतर तिला संपर्क साधलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आरोपींचा मालाड पोलिसांनी शोध सुरु केला होता.