Sat, Mar 23, 2019 12:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैभव राऊत समर्थनार्थ पालघरवासी रस्त्यावर

वैभव राऊत समर्थनार्थ पालघरवासी रस्त्यावर

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:51AMनालासोपारा : वार्ताहर 

स्फोटकांसह एटीएसकडून अटक करण्यात आलेला नालासोपारा येथील गोरक्षक समितीचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप करीत शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी हजारो पालघरवासींसोबत भंडारआळी ते सिव्हिक सेंटर असा भव्य मोर्चा काढला. काळ्या फिती बांधून, काळे ध्वज फडकावून अटकेचा निषेध केला. मोर्चात अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, हरे रामा हरे कृष्णा अखिल भारतीय गोरक्षाप्रमुख दामोदर दास महाराज, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्धन पाटील, माजी सभापती पंकज चोरघे, गोरक्षक निलेश भट सहभागी झाले होते.

वैभवच्या घरापासून गणेश स्तवन करून आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी दीप्तेश पाटील यांनी,  वैभवला फसवण्यासाठी हे षड्यंंत्र रचले जात आहे, असा आरोप केला. प्रसारमाध्यमांनी स्फोटके  घरातून बाहेर नेल्याचे दाखवले पण, ती घरातून बाहेर नेताना त्याचा पंचनामा सुद्धा करण्यात आला नाही. हा पंचनामा का केला नाही, असा सवाल केला. या मोर्चात सुमारे 5 ते 6 हजार पालघरवासीयांनी सहभाग घेतला होता. हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्र, देशभर पसरवणार असल्याचे दीप्तेश यांनी सांगितले. 

घरात लहान मुलगा असताना वैभव एक फटाकासुद्धा ठेवायला घाबरतो. तो बेडरूममध्ये फटाका ठेवत नाही, तिथे बॉम्ब ठेवू शकतो का, असा सवाल करत वैभवची बहीण धनश्री राऊत यांनी एटीएसची ही कारवाई दबावाखाली असल्याचा आरोप केला. 

वैभव गैरकृत्य करणारच नाही तो गोरक्षक आहे, जर त्याने असे केले असेल तर एवढी जनता आली नसती, असेही धनश्री म्हणाल्या.  या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.