Sat, Aug 24, 2019 23:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्याम मानव,  मुक्ता दाभोलकर,  जितेंद्र आव्हाड टार्गेटवर!

श्याम मानव, मुक्ता दाभोलकर, जितेंद्र आव्हाड टार्गेटवर!

Published On: Sep 01 2018 2:08AM | Last Updated: Sep 01 2018 2:05AMमुंबई : अवधूत खराडे

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. श्याम मानव आणि कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पागारकर आणि अविनाश पवार यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. मात्र एटीएसच्या या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करत विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी तपास अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तपासात करण्यात आलेल्या निष्काळजीपणावर ओढलेल्या ताशेर्‍यांची प्रत एटीएस प्रमुखांना पाठवली आहे.

माझगाव डॉकमधून ताब्यात घेत अटक केलेल्या अविनाशची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने एटीएसच्या पथकाने दुपारी बाराच्या सुमारास त्याला विशेष सत्र न्यायालयासमोर हजर केले. यावेळी न्यायालयासमोर आतापर्यंत केलेल्या तपासाची केस डायरी, अन्य दस्तऐवज आणि 12 मुख्य मुद्दे असलेला रिमांड अर्ज सादर करुन 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने केस डायरी, दस्तऐवज आणि रिमांड अर्ज वाचून बघितल्यानंतर मात्र एटीएसला धारेवरच धरले. स्फोटकांप्रकरणी अविनाशच्या अटकेनंतर सहा दिवस काय तपास केला, याबाबत न्यायालयाने विचारणा केल्यानंतर मात्र एटीएस निरुत्तरीत झाले. न्यायालयात केस डायरी आणि अन्य दस्तऐवज सादर केल्याचे सांगितले.

एटीएसने सादर केलेली केस डायरीच न्यायालयाने वाचण्यास सुरुवात केली. त्यात सनबर्न फेस्टिव्हल आणि पद्मावत सिनेमा टार्गेटवर असल्याचे नमूद केल्यानंतर आता डॉ. श्याम मानव, मुक्ता दाभोलकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अजीतदादा अशी इंग्रजीमधील नावे केस डायरीमध्ये नव्याने घुसविण्यात आल्याचे नमूद करत हा स्फोटकांबाबतचा तपास नसून विचारवंतांच्या घडलेल्या हत्याकांडाच्या अनुशंघाने तपास असल्याचे दिसून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मुख्यसुत्रधार म्हणून अमोल काळे याचा पहिल्या रिमांडपासून उल्लेख करत आहात. त्याचा ताबा घेण्यास जराही हालचाल केली नाही. मग अमोल काळेचा अद्याप ताबा का घेतला नाही, असा थेट सवाल न्यायालयाने एटीएसला विचारला. त्यावर एटीएसकडे उत्तर नव्हते.

तब्बल तासभर एटीएसच्या तपासावरुन धारेवर धरल्यानंतर अविनाशची कोठडी मागता, तर गेल्या सहा दिवसांत काय तपास केला हे दाखवा असे बजावत न्यायालयाने दोन तासांचा वेळ एटीएसच्या अधिकार्‍यांना दिला. न्यायालयाच्या या पवित्र्याने एटीएसची पाचावर धारण बसली होती. दुपारी पावणे तिनच्या सुमारास एटीएसचे पथक पून्हा आरोपी अविनाशला सोबत घेऊन न्यायालयात पोहचले. यावेळी एटीएससोबत वकिलांची फौजच न्यायालयात होती. अविनाशचा याआधी अटक केलेल्या आरोपी राऊत याच्यासोबत फेसबूक आणि ट्विटवरुन असलेला संवाद, कनेक्शन, कॉल लॉग, अन्य आरोपींसोबत असलेला रेकीमधील सहभाग, लॉकरमध्ये सापडलेली कोडमधील डायरी, सनबर्न फेस्टीवलच्या काळात अविनाश सुट्टीवर होता, असा तपासाचा भाग एटीएसने न्यायालयात सादर केला.

अविनाशची कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली दोन सिमकार्ड कोणाच्या नावावर होती? असा सवाल न्यायालयाने करताच एटीएसची बोलती बंद झाली. अजून कंपनीकडून माहिती मिळाली नसल्याच्या एटीएसच्या उत्तरावर न्यायालय संतापले. सहा दिवसांत सिमकार्डचा मालक सापडत नाही, फेसबूक, मिरर इमेजचा रिपोर्ट, मोबाईल डाटा रेकॉर्ड अद्याप मिळाला नाही. यावरही न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर एटीएसची बाजू मांडताना, 13 तारखेच्या जप्ती पंचनाम्यावेळी अविनाशसह अन्य काहींची पहिल्यांदा नावे समोर आली. तपासाअंती 24 तारखेला त्याला अटक करण्यात आली, तसेच 26 आणि 27 ऑगस्टचा तपास, जप्ती, पंचनामे न्यायालयात सादर केले आहेत, असे न्यायालयाला पटवून देताना सरकारी वकिलांची मात्र चांगलीच दमछाक झाली.

एटीएसने आरोपी अविनाशच्या कोठडीच्या मागणीसाठी सादर केलेल्या 12 महत्वांच्या मुद्यांच्या रिमांड अर्जाच्या आधारे न्यायालयाने तपास आणि कोठडीची मागणी यावर कायदेशीररित्या ताशेरे ओढत यातील तब्बल 9 मुद्दे खोडून काढले. त्यामुळे आलेला तणाव एटीएसच्या अधिकार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. तर आरोपींजवळून जप्त केलेल्या कंप्युटर हार्डडीस्क, पेनड्राईव्ह, सीडी आणि मोबाईल असा एकूण 10 जीबी डाटा तपासणे, अविनाशच्या लॉकरमध्ये सापडलेली कोडवर्डची डायरी आणि फेसबूक, ट्विटरवरील कनेक्शन या केवळ तीन मुद्द्यांच्या तपासासाठी अवघ्या चार दिवासांची कोठडीचे आदेश बजावले. न्यायालयाच्या या कायदेशीर पवित्र्यामूळे एटीएसला मात्र चांगलीच चपराक बसली आहे.

एटीएस प्रमुखांना प्रत पाठविली

एटीएसच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करत विशेष सत्र न्यायालयाने शुक्रवारी तपास अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरत झापले. केस डायरी आणि रिमांड अर्जामध्ये अर्धवट दिलेली माहिती, गुन्ह्याचा तपास सोडून अन्यच तपास होत असल्याचा निर्माण झालेला संशय, अमोल काळे याचा ताबा घेण्यास प्रयत्नात झालेली दिरंगाई, तपास अधिकार्‍याने तपासात केलेल्या या निष्काळजीपणावर न्यायालयाने ओढलेल्या ताशेर्‍यांची प्रत एटीएस प्रमुखांना धाडली आहे.

एटीएसने केलेली कारवाई

राज्यामध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या गुप्त माहितीवरुन एटीएसने 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपार्‍यातील भंडारअळीमध्ये राहात असलेल्या वैभव राऊत याच्या घरी आणि घराजवळील दुकान गाळ्यावर छापेमारी करुन मोठ्याप्रमाणात बॉम्ब, स्फोटकांचे साहीत्य जप्त केले. याप्रकरणी राऊत याच्यास याच परिसरातून शरद कळस्कर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांना 10 ऑगस्टला अटक केली. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठासुद्धा जप्त केला. तिघांच्याही चौकशीतून जालन्यातील सेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला औैरंगाबादेतून 18 ऑगस्टला बेड्या ठोकल्या. तर 24 ऑगस्टला माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असलेल्या अविनाश पवार याला ताब्यात घेत अटक केली आहे.

अविनाशचा गुन्ह्यातील सहभाग

नालासोपारा स्फोटकांप्रकरणी अटक केलेल्या घाटकोपरमधील रहिवाशी अविनाश पवार याने याआधी अटक केलेल्या वैभव राऊत याची फेसबूकवर फ्रेन्डरिक्वेस्ट स्विकारली. तेव्हापासून तो फेसबूक मॅसेंजरवर मॅसेज आणि कॉलच्या, तसेच ट्विटरवरुन संपर्कात होता. राऊतसह अन्य आरोपींसोबत तो रेकीमध्ये सहभागी होता. त्याने अन्य आरोपींसोबत महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर स्फोटके तयार करणे, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. सनबर्न फेस्टिवलवेळी घातपात करण्यासाठी त्याने माझगाव डॉकमधून 29 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 या काळात सुट्टी घेतली होती. गुन्ह्यासंबंधी त्याच्या लॉकरमध्ये कोर्डवर्ड वापरुन लिहिलेली डायरी सापडली आहे.