Sun, Apr 21, 2019 05:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपारा प्रकरण : आणखी काहींना अटक शक्य

नालासोपारा प्रकरण : आणखी काहींना अटक शक्य

Published On: Aug 13 2018 1:21AM | Last Updated: Aug 13 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

नालासोपार्‍यातून अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या वैभव राऊत याच्यासह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकरकडे राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) मॅरेथॉन चौकशी करत आहे. याच चौकशीतून आणखी काही धागेदोरे एटीएसच्या हाती लागले आहेत. आणखी काहींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच राऊतकडे सापडलेली स्फोटके, साहित्य आणि गोंधळेकरकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्यांवरील फिंगरप्रिंट्स एटीएसने घेतल्या असून, त्याआधारेही काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सणासुदीच्या काळामध्ये राज्यात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून एटीएसच्या पथकाने नालासोपार्‍यातील भंडार आळीमधील राऊतच्या घरावर आणि घराजवळ असलेल्या दुकानावर छापे टाकले. एटीएसला 20 देशी बॉम्बसह सुमारे 50 बॉम्ब बनतील एवढी स्फोटके आणि साहित्य, महत्त्वपूर्ण कागदपत्रे, तसेच दस्तऐवज सापडले.

राऊत याच्या चौकशीतून एटीएसने कळसकर आणि गोंधळेकर यांना ताब्यात घेत अटक केली. शनिवारी गोंधळेकरकडे मोठ्या प्रमाणात असलेला शस्त्रसाठा एटीएसच्या हाती लागला आणि तपासाच्या दिशेला आणखी गती मिळाली. एटीएसच्या पथकाने तिघांकडेही स्वतंत्र आणि एकमेकांसमोर मॅरेथॉन चौकशी सुरू केली आहे.

राऊतकडे सापडलेली स्फोटके आणि साहित्य, तसेच गोंधळेकर याच्याकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्यावरील फिंगरप्रिंट्स घेण्यात येत असून, त्या या तिघांसह अन्य संशयित आरोपीशी ताडून पाहण्यात येत आहेत. 12 ते 13 संशयितांकडेही कसून चौकशी सुरू आहे. यातून महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली आहे. अटकेची आवश्यकता वाटल्यास त्यांना एटीएसकडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता आहे. यासाठी एटीएसने चौकशीसाठी संशयितांची यादी तयार केली असल्याची माहिती मिळते.

मूळचा नालासोपार्‍यातील असलेल्या राऊत याच्यासह औरंगाबादचा असलेला कळसकर आणि सातार्‍यातील गोंधळेकर यांच्या गावच्या कनेक्शनमधूनही त्यांची काही वैयक्‍तिक माहिती मिळते का, यासाठी एटीएसची पथके प्रत्येक विभागात गुप्त चौकशी करत आहेत. एटीएसच्या पथकांनी मोबाईल कॉल रेकॉर्डसह, बँक खाती आणि अन्य ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचीही छाननी एटीएसकडून सुरू आहे.