Thu, Oct 17, 2019 03:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्राने दुष्काळाचे निकष बदलले; शेतकरी अडचणीत

केंद्राने दुष्काळाचे निकष बदलले; शेतकरी अडचणीत

Published On: Dec 23 2017 2:33AM | Last Updated: Dec 23 2017 1:21AM

बुकमार्क करा

नागपूर : विशेष प्रतिनिधी 

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष केंद्र सरकारने जाहीर केले असून या निकषांप्रमाणे राज्याला मदत मिळणे कठीण होणार असल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. हे निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, बोगवड व अंमळनेर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. एकनाथ खडसे यांनी तारांकीत प्रश्‍नाद्वारे केली होती. त्यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी केंद्राच्या नवीन फतव्यामुळे एकही गाव आता दुष्काळाच्या निकषात बसणार नाही याची व्यवस्था करण्यात आल्याचा घरचा आहेर दिला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना दुष्काळ जाहीर करण्याचे केंद्राचे निकष अधिक कठीण झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, आधीच्या निकषात बदल झाले आहेत. पैसेवारी ऐवजी जमीनीतील ओलावा तपासून दुष्काळ जाहीर करण्याची अट त्यात आहे. या अटीमुळे केंद्राची मदत मिळणे अवघड झाले आहे.

राज्यात कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. परंतु, कर्जमाफीचे धनादेश अजून शेतकर्‍यांच्या हातात पडलेले नाहीत. या पाश्‍वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णयही शेतकर्‍यांचा मुळावर येणार असल्याची चर्चा आहे.