मुंबईचा 10 विकेटस्ने विजय

Last Updated: Nov 09 2019 2:11AM
Responsive image


मुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

मुंबईच्या संघाने मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेतील आपल्या लीगमधील सामन्यात मिझोरामवर 10 विकेटस्ने विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. यावर्षी राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या लिलावापूर्वी होत आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या सिद्धेश लाडने फलंदाजीऐवजी गोलंदाजीत चमक दाखवली. पाच विकेटस्ची कमाई करीत त्याने मिझोरमला अवघ्या 77 धावांवरच गुंडाळले व यानंतर हे लक्ष्य 8.1 षटकांत पूर्ण केले. यामध्ये सलामी फलंदाज जय बिश्तने 24 चेंडूंत नाबाद 50 धावा (पाच चौकार व तीन षटकार) तर आदित्य तरे (22) यांनी संघाला विजय मिळवून दिला.

पाहुण्या संघासाठी तरुवर कोहलीने सर्वाधिक 26 धावा केल्या. लाडला जलदगती गोलंदाज तुषार देशपांडे (2/8) याने चांगली साथ दिली. अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णी व शम्स मुल्‍लाणी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत आपले योगदान दिले; पण गटातील उर्वरित तीन सामने खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले. ज्यामध्ये मध्य प्रदेश वि. पुडुचेरी (अवघे चार चेंडू टाकण्यात आले), हरियाणा वि. मेघालय आणि असाम वि. बंगाल (तीन चेंडू टाकण्यात आले) या सामन्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र, विदर्भ संघांचे विजय 

‘क’ गटातील चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्र संघाने रेल्वेवर 8 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या महाराष्ट्राने 15 षटकांच्या झालेल्या लढतीत 6 बाद 104 धावसंख्येपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या रेल्वेला निर्धारित षटकात 8 बाद 96 धावसंख्येपर्यंतच पोहोचता आले. तर, विदर्भ संघाने त्रिपुरावर नऊ विकेटस्ने विजय मिळवत चमक दाखवली. त्रिपुराला निर्धारित षटकात 8 बाद 102 धावसंख्येवर रोखत विदर्भने 12.3 षटकांत 1 बाद 103 धावसंख्येपर्यंत मजल मारत विजय नोंदवला.